किर्लोस्कर कंपनी व्यवस्थापनाचा निर्णय : 41 दिवसांपासून आंदोलन सुरूच
हडपसर : कंपनीत कामगारांची युनियन स्थापन केल्यामुळे हडपसर औद्योगिक वसाहतीमधील किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीतील 131 कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने घरचा रस्ता दाखविला आहे. कामावरून काढल्याच्या निषेधार्थ कामगारांनी मागील 41 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कामगार प्रतिनिधींशी पत्रकारांनी बातचीत केली. यावेळी कामगार अध्यक्ष अभिजीत अडागळे, पदाधिकारी लखन तांबे, सचिन सुरवसे, अशोक गुंजाळ, अंबादास चाकने, विपीन कावळे, अजित देवकर आणि नगरसेवक योगेश ससाणे उपस्थित होते.
कामगारांवर पोलिसांचा लाठीचार्ज
कामगार 41 दिवसांपासून धरणे, उपोषण करत असूनही कंपनी मात्र दडपशाहीचा मार्ग अवलंबून शेकडो कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. व्यवस्थापनाने चर्चा करून हा प्रश्न सोडवावा आणि कामगारांच्या भवितव्याचा विचार करावा, असे नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले. हडपसर पोलिसांनी या सर्व कामगारांना अटक करून पोलीस स्टेशन येथे आणले होते. यावेळी कामगार संतप्त झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. कामगारांनी दोन पोलीस शिपायांना मारहाण केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिली. या कामगारांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.