बरेली । उत्तर प्रदेशातील बरेलीत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीहून गोंडा येथे चाललेल्या बसचा भीषण अपघात झाला. बरेलीमध्ये एका ट्रकसोबत झालेल्या धडकेनंतर बसमधील टँकर फुटला आणि आग लागली. आगीमुळे बसमधून प्रवास करणा-या एकूण 22 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. अपघातग्रस्त बस राज्य परिवहन मंडळाची असून ही बस गोंडा जिल्ह्याच्या दिशेने जात होती.
रविवारी रात्री हा अपघात झाला आहे. बस प्रवाशांना घेऊन दिल्लीहून गोंडा येथे चालली होती. बरेलीत जेव्हा बसचा अपघात झाला तेव्हा बसमधील अनेक प्रवासी झोपलेले होते. अपघात इतका अनपेक्षित होता की प्रवाशांना स्वत:चा जीव वाचवण्यासाठीही वेळ मिळाला नाही. या अपघातामुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेश राज्य परिवहन विभागातील त्रुटी समोर आल्या आहेत. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार अपघातानंतर बसची मागची खिडकी खोलताच आला नाही. त्यामुळे लोकांना जीव वाचवण्यासाठी बाहेर पडण्याची संधीच मिळाली आहे. मागची खिडकी जर खोलता आली असती तर अनेकांचा जीव वाचला असता. पेट्रोल टँक फुटल्याने दोन्ही वाहनांनी लगेचच पेट घेतला. या आगीत बसमधील 22 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर 15 प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामन दलाची गाडी घटनास्थळी लगेचच दाखल झाली. मात्र, आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी बराच काळ लागला. हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही.
अजब अपघात
जयपूर । राजस्थानच्या जयपूरमध्ये घोड्याचा विचित्र अपघात झाला आहे. टांग्याला बांधलेला घोडा उधळला आणि तो थेट कारमध्येच काच तोडून घुसल्याने खळबळ उडाली. जयपूरमधल्या तापमानामुळे घोडा उधळल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जयपूरमध्ये 42 डिग्री तापमान होते. या अपघातामध्ये घोडा आणि कार चालवणारा जखमी झाला आहे. पंकज जोशी असे कार चालवणार्याचे नाव आहे. उधळलेला घोडा थेट काच तोडून कारमध्येच घुसला. या घोड्याला अखेर पोलिसांनी बाहेर काढले.