युरोप लीगचे विजेतेपद मँचेस्टर युनायटेडकडे

0

स्टॉकहोम । अजॅक्स ऍम्स्टरडॅमचा अंतिम लढतीत 2-0 अशा गोलफरकाने पराभव करून मँचेस्टर युनायटेडने युरोपा लीगचे जेतेपद पटकावत चॅम्पियन्स लीगच्या प्राथमिक फेरीसाठी पात्रताही मिळविली. पॉल पोग्बाने 18 व्या मिनिटाला मँचेस्टरचा पहिला गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली. अजॅक्सच्या थ्रो इनमधून चेंडू मिळाल्यावर पाने जबरदस्त फटका मारला तो गोलरक्षक आंदे ओनानाला चकवून जाळयात गेला.

मख्तारयान हेन्रिखने उत्तरार्धात कॉर्नरवर फ्लिक करून मँचेस्टरचा दुसरा गोल नोंदवला. यावेळी समर्थकांनी ‘मँचेस्टर, मँचेस्टर’चा घोष करून स्टेडियम दणाणून सोडले होते. मँचेस्टरने ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत युरोपियन ट्रॉफी प्रथमच पटकावली.

मँचेस्टरमध्ये पॉप कॉन्सर्टनंतर झालेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात बळी गेलेल्यांना सामना सुरू होण्याआधी एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ’अशा प्रकारच्या घटना खरोखरच दुर्दैवी म्हणाव्या लागतील. आम्हाला या लढतीसाठी एकाग्र होण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि आम्ही त्यांच्यासाठी जिंकून दाखविले. आम्ही इंग्लंडसाठी खेळलो, मँचेस्टरसाठी खेळलो आणि हल्ल्यात जे बळी गेले त्यांच्यासाठी खेळलो’, अशा भावना पोग्बाने सामन्यानंतर व्यक्त केल्या. मँचेस्टर युनायटेडने लीग कप आणि कम्युनिटी शील्डचे जेतेपद मिळविले आणि चॅम्पियन्स लीगसाठी पात्रताही मिळविली.