युवकांच्या भविष्यात देशाचे हित – राजेश सांकला

0
राष्ट्रीय युवा संमेलनात सातशे प्रतिनिधींचा सहभाग
पिंपरी : भारतात युवकांची मोठी संख्या आहे. या युवकांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांच्या भविष्यात देशाचे हित दडले आहे. त्यासाठी सुसंस्कृत, चारित्रवान आणि कर्तृत्ववान युवक घडवून त्यांचे संघटन उभारावे. ही संघटीत युवा शक्तीच भारताला महासत्ता करेल, असा विश्‍वास ज्येष्ठ उद्योगपती राजेश सांकला यांनी व्यक्त केला. निगडी प्राधिकरणातील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्यावतीने अखिल भारतीय जैन सोशल ऑर्गनायझेशनचे अखिल भारतीय जैन युवक संमेलन आयोजित केले आहे. या दोन दिवसीय संमेलनाचे पाटीदार भवन येथे शनिवारी मनोहरलाल लोढा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी राजेश सांकला बोलत होते. यावेळी प्रकाश सांकला, बाळासाहेब धोका, सुनील नहार, प्रा.अशोक पगारिया, सुरेश गादीया, मोहन संचेती, सुरेश शेठीया आणि जेएसओचे शहराध्यक्ष तुषार मुथा, कार्याध्यक्ष पवन लोढा आदी उपस्थित होते.
प्रवचनाचे केले आयोजन
पवित्र चातुर्मासानिमित्त कोटा संघ प्रमुख नवकार आराधिका प.पू.प्रतिभाकुंवर महाराज साहेब, प.पू.प्रफुल्ला म.सा., प.पू.हंसा म.सा., प.पू.पुनिती म.सा., प.पू.गरिमा म.सा., प.पू.महिमा म.सा. यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम सुरु आहेत. प. पू. प्रतिभाकुंवर महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या संमेलनात जेएसओचे देशभरातून सातशे युवक प्रतिनिधी या संमेलनात सहभागी झाले आहेत. उपस्थितांना रविवारी संजय रावत (अहमदाबाद), राकेश जैन (इंदोर), कमल आचलिया (रायचूर) हे तज्ज्ञ सेवा, शिक्षा, संघटन; एक कदम गुरु दरबार की ओर; एक कदम जैनत्व की ओर; देशप्रेम भारतीय संस्कृती; उद्योग धंद्यामध्ये प्रगती या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
समाजासाठी चांगले कार्य करावे
प्रास्ताविक करताना निमंत्रक नितीन बेदमुथा म्हणाले की, समाजासाठी चांगले कार्य करायचे आहे. मात्र हे कार्य शाश्‍वत असावे, एका पिढीकडून दुसर्‍या पिढीने ते सहज स्वीकारून सुरू ठेवावे, असा ध्यास आहे. त्याच अनुषंगाने प्रथमच युवकांचे राष्ट्रीय संमेलन पिंपरी- चिंचवडमध्ये आयोजित केले आहे. देशातील निवडक ज्येष्ठ उद्योजकांचे मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळावे आणि त्यांच्या अनुभवातून युवक पिढी समृद्ध व्हावी या उद्देशाने जैन श्रावक संघ काम करीत आहे. समाजहिताचे हे कार्य पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित व्हावे हा हेतू संमेलन घेण्यामागे आहे. नवीन शाखा पदाधिकार्‍यांचा शपथविधी, विशेष सेवाकार्य केलेल्या शाखांना पुरस्कार देऊन या वेळी सन्मानित करण्यात आले. जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय पदाधिकारी पारस मोदी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सुखलाल लोढा, मनोहरलाल लोढा, पवनकुमार लोढा, नितेशकुमार लोढा, पृथ्वीराज लोढा यांनी विशेष सहकार्य केले. शारदा चोरडीया यांनी सूत्रसंचालन केले. आभार तुषार मुथा यांनी मानले.