विद्यार्थी सहायक समितीत ‘ज्ञानसत्रा’चे उद्घाटन
पुणे :विद्यार्थी सहायक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्रातर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित ‘ज्ञानसत्रा’चे उद्घाटन डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते झाले . लजपतराय विद्यार्थी भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिरगे, विद्यार्थी सहायक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर पाटील, विश्वस्त गणेश कळसकर उपस्थित होते .
हे देखील वाचा
यावेळी खासदार आणि पद्मश्री सन्मानाचे मानकरी डॉ. विकास महात्मे म्हणाले, युवापिढी उद्याच्या भारताची आधारस्तंभ आहे. तंत्रज्ञानाच्या साथीला कौशल्य आणि कृतिशीलतेची जोड मिळाली, तर आजचा युवक अशक्य ते शक्य करू शकतो. त्यासाठी शिस्त, जिद्द, प्रामाणिकपणा, परिश्रम घेण्याची तयारी असायला हवी. विद्यार्थी सहायक समिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव काम करीत आहे. समितीतील विद्यार्थ्यांनी भारताच्या निर्माणात महत्वाचे योगदान दिले आहेत आणि देतील असा विश्वास वाटतो. जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत असलेल्या भारताची भिस्त युवकांवरच आहे. त्यामुळे युवकांनी विविध कौशल्ये आत्मसात करण्यासह कृतिशीलतेवर भर द्यावा. प्रत्येक युवक घडला, तर देश आपोआप घडेल असे मत व्यक्त केले .
तर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोगत व्यक्त करताना म्हणाले ,समिती विद्यार्थ्यांच्या परिवर्तनासाठी गेली साडेसहा दशके काम करीत आहे. स्वावलंबन, समता, श्रमप्रतिष्ठा आदी मूल्ये इथल्या मुलांना दिली जातात. आजवर समितीतून हजारो विद्यार्थी घडले असून, आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ही ज्ञानसत्रे अतिशय उपयुक्त ठरतात. पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष जिरगे म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यात निवास-भोजनाची सोय करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या पुणे विद्यार्थी गृह आणि विद्यार्थी सहायक समिती या दोन संस्था आहेत. कोणतीही गोष्ट करताना विद्यार्थ्यांनी त्यामागील कारणमीमांसा अभ्यासली पाहिजे.” असे मत व्यक्त केले . या कार्यक्रम चे प्रास्ताविक प्रा. सचिन जायभाये यांनी केले. लक्ष्मण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तर जीवराज चोले यांनी आभार मानले.