युवकाच्या खून प्रकरणी आरोपीस चार महिन्यानंतर जामीन

0

भुसावळ: छेडखानीच्या वादातून बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर मंगळवार, 5 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता ललित उर्फ विक्की हरी मराठे (24, न्यु एरिया वॉर्ड, भुसावळ) या युवकाचा खून झाला होता तर या प्रकरणी संशयीत आरोपी राजेश उर्फ गोलू सावकारे (20, न्यू एरिया वॉर्ड, भुसावळ) यास अटक करण्यात आली होती. गुन्ह्यानंतर आरोपी कारागृहातच होता. पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यास मंगळवारी 50 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. यापूर्वी आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता मात्र तो न्यायालयाने नामंजूर केला होता.

छेडखानीच्या वादातून झाला होता खून
न्यू इंडिया सब्जी मंडळाची मिरवणूक बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर आल्यानंतर संशयीत आरोपी गोलूने ललितला आपल्या बहिणीची छेडखानी का करतो म्हणून जाब विचारल्याने उभयंतांमध्ये हाणामारी झाली व संशयीत आरोपीने चाकू मारल्याने ललितचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. या प्रकरणी धीरज किशोर मराठे यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली होती. मंगळवारी न्या.डोरले यांच्या न्यायासनापुढे जामिनावर युक्तीवाद झाला. संशयीत आरोपीतर्फे अ‍ॅड.सागर चित्रे व अ‍ॅड.जावेद मेमन यांनी बाजू मांडल्यानंतर 50 हजारांच्या जातमुचलक्यावर आरोपीस जामीन मंजूर करण्यात आला.