युवा शेतकर्‍यांनी आधुनिक शेतीकडे वळावे

0

चाळीसगाव । काळाची गरज लक्षात घेऊन युवा शेतकर्‍यांनी आधुनिक शेतीकडे वळावे, असे आवाहन माजी आमदार जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख यांनी केले. लोंढे येथील शिक्षक भगवान भोसले या शेतकर्‍याने नवी चेतना व आकांक्षादायी ध्यास घेऊन डाळींबाचे भरघोस पीक घेतले आहे त्यांच्या डाळिंब बागेस राजीव देशमुख यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी ते बोलत होते.भोसले कुटूंबियांनी एक आदर्श निर्माण केल्याचे ते म्हणाले.

डाळिंबाची शेती इतरांसमोर आदर्श
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी डाळिंबाचे बाजारपेठेतील दर कमालीचे घसरले असतांना देखील डाळिंबाची शेती करण्याचा भोसले बंधूंचा प्रयत्न इतर शेतकर्‍यांना प्रेरणा देणारा आहे . यात चलनी नोटा बदलानंतर घसरलेले दर अद्यापही वधारले नसून शेतकरी एकीकडे हवालदिल झाला असतांना भोसले कुटूंबियांनी या प्रगत शेतीतून कृषीक्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. असे मत राजीव देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. निसर्गाच्या लहरीपणाचा अभ्यास जेव्हा बारकाईने करु लागलो तेव्हा लक्षात आले की येथील निसर्गाच्या लहरीपणाला तितक्याच सक्षमपणे तोंड देऊ शकेल व जेव्हा योग्य परिस्थिती असेल तेव्हा ते पीक साथ देईल अशा पिकाची निवड करणे गरजेचे होते. त्या विचारमंथनातूनच डाळींबाचे उत्पादन करावे ही संकल्पना साकार झाल्याचे भगवान भोसले यांनी सांगितले. यावेळी रामचंद्र जाधव,भगवान पाटील,दिपक पाटील,जयाजी भोसले तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते