भुसावळ । शहरातील संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मल्टी डीसीप्लेनरी रिसर्च सेलद्वारा प्रणीत ब्लंका बॉट्स संघ अमेरिका, रशिया, ब्राझील, व यूरोपीय खंडातील रोबोटिक्स संघाविरुद्ध सामना करण्यासाठी चीनला जाणार आहे. अक्षय जोशी, विनय चौधरी, योगेश गाजरे, शुभम नेमाडे, अनिकेत किनगे, रवींद्र आभाळे, मोहित चौधरी, शुभम दुसाने, वीरेंद्रसिंह खंडाळे ही नऊ विद्यार्थ्यांची टीम चीनमध्ये आयोजित रोबोटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. देशातील नामांकित संस्थांच्या विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर आता थेट चीनमध्ये ‘फाइट माय रोबोट’ या स्पर्धा प्रकारात आंतरराष्ट्रीय संघाशी मुकाबला करण्यासाठी गाडगेबाबा अभियांत्रिकीची टीम सज्ज झाली आहे. हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव एम.डी. शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी. तिवारी, प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह यांच्या पुढाकाराने या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा नुकताच झाला.
रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या सुवर्णकाळची नांदी
विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने 80 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली. तेव्हा तांत्रिक व आर्थिक स्वरुपाची सर्व प्रकारची मदत हिंदी सेवा मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना नेहमीच केली आहे व पुढेही करत राहु असे सांगुन एम.डी. शर्मा यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह व आत्मविश्वास वाढवला. विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘खाशाबा’ आणि ‘दारा’ सात आंतरराष्ट्रीय संघांना मात देतील व ही परिसरातील रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या सुवर्णकाळची नांदी असेल, असे प्रेरणादायी मार्गदर्शन प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी केले. याप्रसंगी प्रा.एस.बी. ओझा, प्रा.पंकज भंगाळे, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.दिनेश पाटील, प्रा.अजित चौधरी, प्रा. गजानन जाधव, प्रा.जितेंद्र चौधरी, प्रा. नितिन खंडारे, डी. के.पाटील, प्रा.धिरज पाटील, प्रा.सचिन देशमुख, विजय विसपुते, शैलेश बुंदेले, रोहित निर्मल उपस्थित होते.