मुंबई : यू ट्युबवर व्हिडीओ पाहण्यास विरोध केल्याने मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रावणी घोलप (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. हि घटना परळ भागातील भोईवाडा परिसरात घडली.
प्राप्त माहितीनुसार, श्रावणीने यू ट्युबवर शरीरातून आत्मा काढून स्वर्गाची यात्रा करून पुन्हा शरीरात येणे (astral travel) हा व्हिडिओ पाहिला होता. त्यानंतर तिनेही थेट स्वर्गात जाण्यासाठी प्रात्यक्षिक करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे तिच्या आजीने तिला व्हिडीओ पहाण्यास विरोध केला होता. या मुलीला स्वत:चे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकायचेही व्यसन लागले होते. गुरुवारी (१० जानेवारी) श्रावणीच्या वडिलांचा वाढदिवस होता. वडिलांच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत होती. पण हे पाहून आजीने तिला व्हिडीओ टाकण्यास विरोध केला. हाच राग मनात ठेवून श्रावणीने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते. ही मुलगी भोईवाड्यात आई-वडील आणि आजीसोबत राहत होती. तिचे वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. या घटनेमुळे भोईवाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.