येणार्‍या निवडणूकीत खासदार शिवसेनेचाच – मंत्री ना. गुलाबराव पाटील

0

जळगाव । लोकसभा मतदार संघाचे खासदार ए.टी. पाटील यांच्या विजयासाठी सर्वाधिक प्रयत्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केले. त्यांनी घेतल्या नाही त्यापेक्षा जास्त सभा मी घेवुन त्यांचा प्रचार केला. खासदार पाटील यांना त्यांच्या स्वतःच्या मतदार संघात मिळाली नाहीत तेवढी मते शिवसेनेच्या मतदार संघात मिळाली आहेत. आता मात्र, आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचाच खासदार निवडून आणणार असा निर्धार सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा बैठकीत व्यक्त केला. शिवसेनेची जळगाव लोकसभा मतदार संघाची जिल्हा बैठक रविवारी शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात झाली. यावेळी व्यासपीठावर लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख संजय सावंत, आ. किशोर पाटील, माजी आ. आर.ओ. पाटील, माजी आ. चिमणराव पाटील, संघटक जळकेकर महाराज, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, ग्रामीण संपर्कप्रमुख महेश खैरनार उपस्थित होते.

त्यांच्या अपयशातच आपले यश
संजय सावंत यांनी, आतापासून कामाला लागलो तरच जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार विधानसभेवर पाठवू शकु. भाजप सोशल मीडिया, टेलीव्हीजन व पेपरच्या माध्यमातून फसव्या जाहिरात करतो. हे सरकार कसं फसवं आहे, हे आपण मतदारांना दाखवू शकतो. त्यांचे अपयश हे आपले यश होवू शकते. त्यासाठी ‘शिवसेना आपल्या दारी’ या आपल्या धोरणानुसार नागरिकांच्या दारापर्यंत गेले पाहिजे, असे सांगून निवडणूक कोणतीही असो शिवसैनिक पेटून उठला पाहिजे. येणार्‍या निवडणूकांमध्ये गाफील राहून चालणार नाही, नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही, असे स्पष्ट केले.

युती न करण्याचा सूर
माजी आ. आर.ओ. पाटील यांनी, युती करायची नाही हे आता सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ झाले आहे, त्यामुळे आपल्याला आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. नविन उमेदीने कामाला लागावे असे आवाहन केले. तर माजी आ. चिमणराव पाटील यांनी, आपला पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा वसा घेऊन शिवसेनेचे कार्यकर्ते काम करत असल्याचे सांगितले. विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी युती न करण्याचा सूरच सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.