येत्या 48 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

0

मुंबई । मान्सूनने महाराष्ट्रात आगेकूच केली असून, येत्या 48 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकणासह कोल्हापुरात मान्सून दाखल झाला आहे. मान्सून पुढील काही तासांत महाराष्ट्रात सक्रिय होणार असल्याची माहितीही हवामान खात्याने दिली आहे. कोकणात मान्सून दाखल झाला आहे. कोल्हापुरातही आगमन झाले आहे. काही तासांमध्ये मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे. तसेच पुढील 48 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सकाळीही दमदार ‘एन्ट्री’
पुढील 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील काही भागांत काल रात्रीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. आज सकाळीही मुंबईसह उपनगरांमध्ये दमदार ‘एन्ट्री’ केली. पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, कोकणात अनेक ठिकाणी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईला लागूनच असलेल्या बदलापूर, कर्जत, नेरळ, माथेरान आदी परिसरातही काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. कोल्हापुरातही पावसाचे आगमन झाले. बुलडाणा जिल्ह्यातही काल पावसाने दमदार हजेरी लावली होती. संध्याकाळपासूनच बुलडाणा, मेहकर, चिखली तालुक्यासह ग्रामीण भागात पाऊस जोरदार बरसला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता.

धुळे-सूरत आणि नागपूर महामार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प
मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने दमदार बॅटिंग सुरु केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रात्रभर जोरदार पाऊस झाला. कांदिवली, मालाड, दहिसर, मिरारोड या भागात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. दक्षिण व मध्य मुंबईमध्ये रिमझिम पावसामुळे वातावरणात सुखद गारवा अनुभवायला मिळाला. पुढच्या काही तासात मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुसळधार पावसामुळे धुळे-सूरत आणि नागपूर महामार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली होती. महिर फाट्याजवळ जोरदार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्ताच वाहून गेला. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

गडचिरोलीत 4 ठार, 8 जखमी
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील धन्नूर गावात वीज कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पोलिस कर्मचार्याचा समावेश आहे. 8 जण जखमी झाले असून त्यांच्यावर आष्टी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सर्व धन्नूर येथे एका विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. पाऊस सुरु झाल्याने ते झाडाखाली उभे होते. त्याच झाडावर वीज कोसळली. चौघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. लातूरमध्येही वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.