येत्या 8 वर्षात नष्ट होतील पेट्रोल कार

0

नवी दिल्ली । एक अत्यंत धक्कादायक आणि सर्वांना विचार करायला लावणारा अभ्यास अहवाल प्रसिध्द झाला आहे. येत्या आठ वर्षानंतर जगाच्या पाठीवर कुठेही पेट्रोलवर चालणार्‍या गाड्या, डिझेलवर धावणार्‍या कार, बस, ट्रक विकल्या जाणार नाहीत. लोक इलेक्ट्रिकवर चालणार्‍या गाड्या वापरतील. पेट्रोल-डिझेलच्या किमती कोसळतील आणि पेट्रोलियम उद्योगाने जे राज्य जगावर केले ते ही संपेल, असा भविष्यकालीन अभ्यासपूर्ण दावा स्टॅण्फोर्ड विद्यापीठातील अर्थतज्ज्ञ टोनी सेबा यांनी केला आहे. ‘रिथिंकिंग ट्रान्सपोर्टेशन 2020-2030 हा अभ्यास त्यांनी नुकताच प्रसिद्ध केला. आणि तो अभ्यास वाहन उद्योग, पेट्रोल उद्योग, पर्यावरण ते अर्थव्यवस्थांमधील बदल अभ्यासणारे तज्ज्ञ यांसार्‍या जगात तो अभ्यास चर्चेचा विषय ठरलेला आहे.

पेट्रोल पंप, स्पेअर पार्ट मिळणे होणार अवघड
जे लोक फार नॉस्टेल्जिक असतील, आठवणीत रमत बसतील तेच फक्त सवय म्हणून कार घेवून ठेवतील. जुनी कार दारात उभी करतील. मात्र बाकीचे काळासोबत नवीन वाहन स्वीकारतील. यापुढच्या काळात पेट्रोल पंप सापडणे, स्पेअर पार्ट मिळणे हेच अवघड होवून जाईल. कारण पेट्रोल डिझेलवर चालणार्‍या गाड्याच कमी होतील. कार डिलर ही गोष्ट 2024 पर्यंत संपूनच जाईल.

तुम्हाला तुमची गाडी विकायला पैसे द्यावे लागतील
येत्या काळात लोक गाड्या चालवणेच बंद करतील. सेल्फ ड्राईव्ह इलेक्ट्रिक व्हेइकल्सना ( इव्ही) मागणी वाढेल. येत्या काळात ही इलेक्ट्रिक व्हेइकल्स वापरणं सध्या वापरत असलेल्या पेट्रोल-डिझेलवर चालणार्‍या गाड्यांपेक्षा 10 पट स्वस्त पडेल. हेच नाही तर अनेक शहरात ड्रायव्हर म्हणून गाडी चालवण्याची मानवाला परवानगी देणेच बंद होवून जाईल. कारण मनुष्य वाहनचालक हा किती धोकादायक गाड्या चालवतो, किती अपघात होतात हे जग पाहते आहेच. कदाचित उपनगरातच फक्त गाड्या चालतील. अनेक गाड्यांची विल्हेवाट लावली जाईल. सेकंड हॅण्ड गाड्यांचे भाव तर उतरतीलच. पण काळ असाही येईल की तुम्हाला तुमची गाडी विकायला पैसे द्यावे लागतील.

ऑईल आणि वाहन उद्योगाला बसणार मोठा तडाखा
ऑईल आणि वाहन उद्योगाला याचा मोठा तडाखा बसेल असा त्यांचा अभ्यास आहे. क्रूड ऑईलच्या किमती पडतील आणि 25 युएस डॉलर प्रती डॉलर इतक्या त्या खाली येतील.जनरेशन नेक्स्टची कार ही कम्प्युटर ऑन व्हील या तत्वानं चालेल. ऑटो कार, इलेक्ट्रिक कार चा जमान येईल असा हा अभ्यास सांगतो. आणि जगभरातल्या उद्योगांवर याचा काय परिणाम होईल याचा तपशिलही देतो. सामान्य माणसाच्या प्रवासात बदल होवू घातला आहे, हे मात्र हा अभ्यास वारंवार अधोरेखित करतो.