योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद घेत रमणसिंग यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

0

रायपुर- छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी आज राजनांदगाव येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी रमणसिंह आणि त्यांचा मुलगा अभिषेक सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चरणस्पर्श करून’ मिशन ६५’ साठी आशीर्वाद घेतले.

योगी आदित्यनाथ यांचा आशीर्वाद सर्व उमेदवारांना मिळणार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसकडून माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतणी करुणा शुक्ला या रमणसिंह यांच्याविरोधात उभ्या आहेत. याबाबत रमणसिंह यांनी आपल्याला कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले.

माध्यमांशी चर्चा केल्यानंतर रमणसिंह यांनी योगी आदित्यनाथ आणि कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. १२ नोव्हेंबर रोजी मतदान तर ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.