लखनौ – लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या मजुरांच्या मदतीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उत्तर प्रदेशमधील सुमारे २७ लाख मनरेगा मजुरांच्या खात्यात एकूण ६११ कोटी रुपये जमा केले आहेत. दरम्यान, योगी सरकारने राज्यातील रोजंदारीवर काम करणार्या सुमारे २० लाख मजुरांच्या खात्यात यापूर्वीच प्रत्येकी एक हजार रुपये जमा केले होते.
योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी व्हिडीओे कॉन्फरन्सव्दारे मनरेगा योजनेवरील मजूरांशी संवाद साधला. यावेळी अंत्योदय योजना, मनरेगा आणि श्रम विभागात नोंद असलेल्या सुमारे एक कोटी ६५ लाख ३१ हजार मजुरांना एका महिन्याचे धान्य मोफत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कुटुंबांना २० किलो गहू आणि १५ किलो तांदूळ मोफत मिळतील. त्याशिवाय निवृत्ती वेतनाचा लाभ घेणार्या ८३ लाख ८३ हजार जणांना दोन महिन्यांचे निवृत्तीवेतन आगावू देण्यात येत आहे.