ठेकेदाराकडून उद्यान विभागाकडे रोपांची मागणी; प्रशासन मात्र ढिम्मच..
पिंपरी चिंचवड : वसंताची चाहुल लागताच निसर्ग रंगाची उधळण करण्यासाठी सज्ज होतो. अशीच अनेक शोभेची फुलझाडे पिंपरी चिंचवड शहरात एकेकाळी मोठ्या संख्येने रस्त्याच्या कडेला, उद्यानात, टेकडी परिसरात बहरून दिसत होती. परंतु, वाढते शहरीकरण आणि पालिका उद्यान विभागाचे नेहमीचेच असणारे दुर्लक्ष अशा कारणांमुळे शहरातील शोभेच्या फुलझाडांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये वेगाने घट होत आहे. याकडे उद्यानविभाग लक्ष देईल का? यावर मात्र प्रश्न निर्माण झाला आहे.
वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष…
विविध रंगाच्या गुलबक्षी, गुलमोहर, कोरांटी, बहावा, विविधरंगी आणि प्रजातीचे बोगणवेल, लाल निवडूंगी, जंगली जास्वंद, मैदानी वडेलिया, बांधावरची पिवळी कण्हेर, विविधरंगी चाफा, रंगीत अष्टर या शोभेच्या फुलझाडांची संख्या शहरातून दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत. फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली की प्राधिकारणातील उद्याने मग ते संत ज्ञानेश्वर असो की गजानन महाराज उद्यानांमध्ये अनेक विविधरंगी फुलांचे दर्शन व्हायचे. परंतु लागवड आणि उद्यान विभागाची उदासीनता यामुळे सदरची फुलझाडे नष्ट झाली आहेत.
हे देखील वाचा

मधमाश्या, फुलपाखरांची संख्यांही अदृश्य…
या झाडांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती पर्यावरण विभागाचा एक अभ्यास गट कार्यरत आहे. समितीचे अध्यक्ष विजय पाटील, विजय मुनोत, संदीप सकपाळ, विजय जगताप, संतोष चव्हाण हे पर्यावरणपूरक शोभेच्या झाडांचा अभ्यास करीत आहेत. सदरच्या फुलझाडांमुळे मधमाश्या, विविधरंगी कीटक, फुलपाखरे, छोटे पक्षी यांचीही संख्या कमी झाल्याचेही निदर्शनास येत आहे.
उद्यान विभागावर कारवाईची मागणी….
याबाबत पर्यावरण अभ्यासक समिती प्रमुख विजय पाटील म्हणाले की, एके काळी प्राधिकारणातील उद्याने विविधरंगी फुलोर्यासाठी तसेच हिरवाईसाठी आदर्श होती. परंतु महापालिका उद्यान विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका प्राधिकारणातील या उद्यानांनाही बसला आहे. फुलझाडांच्या अपुर्या पुरवठयामुळे रंगांची उधळण आता नजरेआड होत आहे. चुकीच्या पद्धतीने काम करणार्या अधिकारी – अधीक्षकांवर बाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.