रंग खेळतांना फेकले गटारीचे पाणी; दोघांना मारहाण

0

जळगाव। लक्ष्मी नगरात सोमवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास रंग खेळताना काही तरूणांनी गटारीचे पाणी अंगावर फेकले. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांना बेदम मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी चौघांना अटक करून प्रथम न्यायदंडाधिकारी एस. जे. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

चौघांची न्यायालयीन कोठडीत रवागनी
लक्ष्मीनगरात बंटी उमाकांत सूर्यवंशी, विशाल उर्फ अंडेवाला नथू साळुंखे (वय 18, रा. कासमवाडी), ललित उमाकांत दिक्षीत (वय 18, रा. ईश्वर कॉलनी), किशोर पुरूषोत्तम क्षिरसागर (वय 18, रा. रचना कॉलनी)आणि एक अल्पवयीन मुलगा हे सोमवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास रंग खेळत होते. त्यावेळी रस्त्याने जाणार्‍या बंटी संजय बाविस्कर (वय 25, रा. लक्ष्मीनगर), सागर सुरेश टेंभुर्णीकर यांच्या अंगावर गटारीचे पाणी फेकले. गटारीचे पाणी फेकल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बंटी बाविस्कर आणि सागर यांना चौघांनी लोखंडी रॉड, क्रिकेटचा स्टम्प, लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी बंटी बाविस्कर याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चौघांना अटक करून मंगळवारी न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मोबाईल चोरटा एलसीबीकडून जेरबंद
जळगाव। एसटीमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाश्याच्या खिशातून मोबाईल लांबविणार्‍या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली असून त्याला पूढील कारवाईसाठी जामनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 21 डिसेंबर 2016 ला कांचन संदिप बेलदार ह्या जळगाव-नेरी दिगर गावाचे दरम्यान जळगाव ते जामनेर एस.टी.ने प्रवास करीत असतांना अज्ञात इसमाने 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला होता.याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 13 रोजी पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर तालुक्यातील खडकी येथे सापळा रचत राहूल तुकाराम जाधव वय-30 याला अटक केली. त्याच्याजवळून चोरीस गेलेला मोबाईल पथकाने जप्त केला आहे.