पुणे । शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन, भजन, गझल, भावगीत, भक्तीगीत आणि चित्रपट संगिताच्या माध्यमातून हिंदी, मराठी, भोजपुरी आणि बंगाली भाषांमधील लोकसंगीताचा प्रवास उलगडत गेला. त्याला रसिकांची भरभरून दाद मिळाली. निमित्त होते भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत आयोजीत रंग रसिया या अनोख्या कार्यक्रमाचे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय विद्याभवनचे संचालक आणि मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी केले. सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या कलाकार चमूने हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात गायक राजेश दातार आणि प्रज्ञा देशपांडे यांना प्रसन्न बाम, प्रमोद जांभेकर आणि नितीन जाधव या कलाकारांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन वीणा गोखले यांनी केले.
लोकसंगीताने घेतला रसिकांच्या मनाचा ठाव
बरसत लागे सावन बत्तीया, आजा तोहें बिन लागे ना मो-हां जीयां या कजरा लोकसंगीत प्रकारातील गीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. या गीतानंतर मुंबईचा जावई या चित्रपटातील प्रथम तुज पाहता जीव वेडावला या नाट्यसंगीताच्या ढंगाने जाणार्या चित्रपट गीताने उपस्थितांना गतकाळात नेले. उज्जवल आणि समृद्ध परंपरा लाभलेल्या संगीत नाटकांचा आढावा घेताना प्रत्येकाच्याच मर्मबंधात स्थानबद्ध असलेल्या सन्यस्तखड्ग या संगीत नाटकातील मर्मबंधातली ठेव ही या नाट्यपदाने उपस्थितांची दाद मिळवली.
रसिक मंत्रमुग्ध
प्रमाचे लग्नात रुपांतर झाल्यानंतर सुरु होणार्या सहजीवनाला गदीमांनी सुंदररित्या शब्दबद्ध केले आहे, त्याचा प्रत्यय या सुखांनो या गीतांतून रसिकांनी घेतला. संसारीक चित्र रेखाटताना गदीमांनी अध्यात्मालाही त्यांच्या शब्दांत गुंफत पंढरपूरच्या विठ्ठलाचे वर्णन केले आहे. गायक राजेश दातार यांनी कानडा राजा पंढरीचा हे भक्तीगीत सादर करून गदीमांच्या शब्दांचे सार्मर्थ्य आणि पंढरीच्या विठ्ठलाचे सावळे, गोजिरे रुप उलगडून दाखविले. यानंतर सादर झालेल्या भोजपुरी आणि बंगाली लोकसंगीतातील गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.