जळगाव : हृदयविकार टाळण्यासाठी नैसर्गिक आहार, विहार, व्यायाम आणि पथ्थे पाळा व मधुमेह, रक्तदाबाचा त्रास असणार्या व्यक्तींनी ते नियंत्रणात ठेवावे, असे हृदयरोग तज्ञ डॉ. सुनिल सुर्यवंशी यांनी प्रतिपादन केले. येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन व सम्यक समाधान फाऊंडेशनतर्फे स्व. महेंद्र (राज) सुरवाडे यांच्या स्मरणार्थ श्री हॉस्पीटल येथे मोफत व अल्पदरात लिपीड प्रोफाईल व ईसीजी चाचण्या आरोग्य अभियानांतर्गत करण्यात आल्या. याकार्यक्रमाचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानात 107 व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या.
दरम्यान मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे दुपारी 5 ते 7 या वेळेत हृदयविकार मार्गदर्शन शिबिरात डॉ. सुनिल सुर्यवंशी यांनी पॉवर पॉईट प्रेझेंटेशनद्वारा हृदयविकार, त्याची लक्षणे, उपाय व उपचार या विषयी सविस्तर माहिती दिली. नंतर हृदयविकार व आरोग्य विषयक प्रश्नांना उत्तरे दिली.
हे देखील वाचा
प्रास्ताविक श्री हॉस्पीटलचे डॉ. सुरेंद्र सुरवाडे यांनी तर सूत्रसंचालन सम्यक समाधान फाऊंडेशनचे ऍड. समाधान सुरवाडे यांनी केले. निरज सुरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष किशोर सुर्यवंशी यांनी मानले.
यशस्वीतेसाठी अभियान प्रमुख डॉ. विद्या सुरवाडे, पॅथालॉजिस्ट डॉ.अमृता देशपांडे, रोटरी मिडटाऊनचे मानद सचिव मनोज पाटील, डॉ. श्रृती सुरवाडे यांच्यासह तीनही आयोजक संस्थांच्या पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.