तळोदा । तळोदा शहरापासून जवळच असलेल्या अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्गावर दुचाकीच्या मागे बसलेल्या अमरसिंग ईश्वर ठाकरे (वय 60) या वृद्धाला अचानक रक्ताची उलटी होवून, डांबरी रस्त्यांवर खाली पडल्याने त्यात त्याच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात देवीसिंग सन्या पाडवी यांचा फिर्यादीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुचाकीवर जातांना झाली घटना
गुजरात राज्यातील उबद (ता. कुंकरमुंडा जि. तापी) येथील अमरसिंग ईश्वर ठाकरे (वय 60) व गोंडाळे ता. तळोदा येथील भाजीपाला विक्रेता देवीसिंग सन्या पाडवी (वय 35) हे दोघे तळोदा येथे टरबूज शेती पाहण्यासाठी एमएच 18 एबी.2545 या दुचाकीवरुन जात होते. सकाळी 9 वाजेच्या सुमारास तळोदा शहरापासून जवळच असलेल्या अंकलेश्वर – बर्हाणपूर महामार्गावरील आशापुरी मातेचा मंदिराजवळ आल्यावर, दुचाकीच्या मागे बसलेल्या अमरसिंग ईश्वर ठाकरे या वृद्धास अचानक त्रास होऊ लागल्याने त्याने गाडी थांबविण्यास सांगितले. गाडी वरुन खाली उतरत असतांना तिथेच त्यांना रक्ताची उलटी झाली व चक्कर येवून डांबरी रस्त्यांवर पडले, त्यात त्यांना दुखापत होवून जागीच मयत झाल्याची घटना घडली. सदर घटना कळताच पोलीस उपनिरीक्षक पंकज शेवाळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झालेत व त्यांनी अमरसिंग ठाकरे या वृद्धास तात्काळ तळोदयातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु सदर व्यक्ती मयत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.कॉ. आधार सोनवणे हे करीत आहे.