नंदुरबार- सरकारी इंजेक्शन बाहेर विकता येत नाही, असे असताना रोटरी वेलनेस सेंटरला ते मिळालेच कसे ? तसेच माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांची बाजू का घेत आहे ? असा प्रश्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केला.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन खासदार हिना गावित यांच्यावर आरोप केले होते. त्याचा पलटवार करण्यासाठी खासदार हिना गावित यांनीही सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन रघुवंशी यांच्या आरोपांचे खंडन केले. त्या म्हणाल्या की, राजकारण येण्याआधी मी आरोग्य शिबिर घेतले तेव्हा अनेक अडचणी लक्षात आल्या, त्या सोडवण्यासाठी राजकीय क्षेत्रात आली आहे. मी स्वतः डॉक्टर असल्याने मला रुग्णांची व्यथा माहित आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत मी वारंवार तक्रारी करीत आहे, तेव्हा कुठे यंत्रणा कामाला लागली आहे. माझ्या प्रयत्नांमुळे पंधराशे इंजेक्शन कोविड रूग्णालयाला मिळाले. रोटरी वेलनेस सेंटर सारखे बाहेर विकले नाहीत. जिल्हाधिकारी त्यांच्यावर मी वैयक्तिक टीका करत नाही, त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते माझ्यासमोर उभे राहतील असा त्याचा अर्थ लावला जात आहे, परंतु मी टॉप टेन खासदार माणिकराव गावित तसेच सीनियर आमदार के. सी. पाडवी यांच्यासमोर लढली आहे आणि जिंकली देखील आहे. त्यामुळे भविष्यात माझ्यासमोर कोण उभा राहील याची मला परवा नाही. मी केलेल्या कामांवर माझा भरोसा आहे. त्यामुळे लोक ते विसरणार नाही. असे सांगून खा गावित म्हणाल्या की माझें शिक्षण हे मेरीटवर झाले आहे, त्या उलट आमदार रघुवंशी यांच्या मुलीसाठी त्यांनी डोनेशन दिले होते, झराळी फार्म हाऊस आणि नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत, ते लपवण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे जिल्हाधिकाऱ्यांची बाजू घेत असल्याचा आरोप खा हिना गावित त्यांनी केला
Next Post