रजनीकांत हा आता जगभरच्या चर्चेचा विषय असतो. त्याचे पडद्यावरचे कैसे ते चालणे, कैसे ते बोलणे, सगळेच कसे लुभावणारे असते. त्यातून त्याचे चित्रपट, त्यांनी केलेली कमाई हे सगळे दिवसेंदिवस चढत्या भाजणीने असल्यानेही रजनी हा जगभर कुतूहलाचा विषय न ठरता तरच नवल. मूळ मराठी असलेला रजनी बंगळुरूमध्ये पोटापाण्यासाठी बस कंडक्टर म्हणून काम करत होता. परंतु, चित्रपटांच्या वेडापायी तो तामीळनाडूत गेला आणि बघताबघता तो तामीळच बनून गेला. तामीळनाडू हेच त्याचे घर, तामीळभाषिक हेच त्याचे बांधव आणि त्यांची सुख-दुःखं ही त्याची सुखदुःखं. पडद्यावर खलनायकापासून महानायकापर्यंत सर्वप्रकारच्या भूमिका साकारणारा अभिनेता वेगळा आणि पडद्यामागचा कुटुंबवत्सल, सहृदय व संवेदनशील माणूस वेगळा. रजनीनं हे द्वैत आजतागायत कायम राखलं आहे. पडदा आणि वैयक्तिक आयुष्याची सरमिसळ त्यानं कधीच होऊ दिलेली नाही म्हणूनच तो कदाचित इतरांपेक्षा अधिक यशस्वी ठरला असावा. याबाबत साधं उदाहरण बघायचं, तर सार्वजनिक जीवनात वावरताना रजनी अगदी साधेपणानं वावरतो. मध्यम शरीरयष्टीचा काळा (सावळा म्हणताच येणार नाही), विरळ झालेल्या केसांतून डोकावणारे टक्कल उघडे ठेवून हसतमुखाने आजूबाजूला वावरणारा रजनी एरवी आपल्याला सहज ओळखूही येणार नाही. त्याचे जे काही स्टारडम दिसते ते पडद्यावरच.
रजनीबाबत एक गमतीशीर आठवण आवर्जून सांगण्यासारखी आहे. सन 1996 मध्ये तामीळनाडूत लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होत्या. अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता तेव्हा फॉर्मात होत्या. त्यांना रोखावे कसे, अशी चिंता द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांना होती. त्याच सुमारास रजनीचा पडेअप्पा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. निवडणुकीच्या वार्तांकनाच्या निमित्ताने मी चेन्नईत गेलो होतो. त्यावेळी पडेअप्पाचे जे स्वागत तामीळबंधूंनी केले, ते पाहून मलाही अचंबित व्हायला झाले होते. त्यातील रजनीचे संवाद तामीळबंधूंमध्ये इतके लोकप्रिय झाले होते, की विचारायची सोय नाही. असो. त्या निवडणुकीत जयललितांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाचे खापर या पडेअप्पावरही फोडले गेले! जयललिता त्यावरून रजनीवर नाराज होत्या, तर करुणानिधी त्याला आपल्या कंपूत ओढण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, रजनीने ती सर्व परिस्थिती कमालीच्या समंजसपणे हाताळली.
मुख्य म्हणजे रजनीचे पुढील काळातील वागणे इतके संयमी होते, की जयललितांचा त्याच्यावरील राग नाहिसा झाला होता आणि करुणानिधीही त्याला जवळचेच मानत होते. आता जयललितांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या त्यांच्या आरकेनगर या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. शशिकला यांचा अण्णाद्रमुक, पन्नीरसेल्वम यांचा अम्माद्रमुक आणि द्रमुक या तीन पक्षांनी या मतदारसंघात विजयासाठी जोर लावला आहे. रजनीने आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून शशिकला गट, पन्नीरसेल्वम आणि द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी जंगजंग पछाडले, पण माझा कुणालाच पाठिंबा नाही, असे सांगत रजनीने या तिघांपासून अंतर राखणेच पसंत केले. माझी बांधिलकी प्रेक्षकांशी आहे, पक्षांशी नाही, असे तो म्हणतो. त्याच्यातील माणूस आणि कलाकाराचे भान कसे आहे, हेच यातून दिसते.
असा हा रजनी कोणताही गाजावाजा न करता सामाजिक कार्यातही अग्रेसर असतो. त्याच्या कथा (आणि मीठमसाला लावलेल्या अनेक दंतकथाही) अनेकदा सांगितल्या जातात. सध्या 2.0 या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणात रजनी व्यस्त आहे. लायका ग्रूप हा चित्रपट बनवत आहे. या ग्रूपने श्रीलंकेतील जाफनामध्ये बेघर तमिळींसाठी सुमारे दीडशे घरे बांधली असून, त्याचे लोकार्पण रजनीच्या हस्ते करण्याचे ठरले. रजनीने त्याला आनंदाने होकार दिला. या उपक्रमासाठी त्यानेही त्याचे काही योगदान दिल्याचे सांगितले जाते. 9 एप्रिलला हा सोहळा जाफनात होणार होता. परंतु, श्रीलंकेतील तामिळींची दुर्दशा अद्याप कायम असल्याने रजनीने या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असे सांगत श्रीलंकेतील एका तामिळी संघटनेने निदर्शने केली. श्रीलंका सरकार रजनीच्या भेटीचे भांडवल करेल, अशी भीती या गटाला वाटते. रजनीने ही परिस्थिती लक्षात घेत आपली जाफना भेट रद्द केली खरी, पण त्याने तेथील तामीळ बांधवांना एक पत्र पाठवून आपल्या भावना कळवल्या. तुम्ही माझ्यावर प्रेम करता, हे माझे भाग्यच आहे. खूप कठीण प्रसंगांतून तुम्हाला जावे लागते, याची मला जाण आहे. हे दिवस पालटावेत, असेही मला वाटते. त्या चांगल्या दिवसांसाठी मी प्रार्थना करतो आणि परिस्थितीत सुधारणा झाली, की मी नक्की तुमच्या भेटीला येतो, असे त्याने या पत्रात म्हटले आहे. रजनीतल्या संवेदनशील माणसाचे हे दर्शनही लुभावणारे नाही का?
जाता जाता आणखी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. मलेशियात लवकरच निवडणूक होणार आहे. मलेशियातील तामिळी आणि भारतीय वंशाच्या मतदारांची संख्या सुमारे दहा टक्क्यांच्या आसपास आहे आणि या सर्व 10 टक्के लोकांवर रजनीचा जबरदस्त पगडा आहे.
मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांनीही ही गोष्ट डोळ्याआंड होऊ दिलेली नाही. म्हणूनच गुरुवारी त्यांनी चेन्नईत येऊन रजनीकांतची भेट घेत आपल्या भारत दौर्याला सुरुवात केली, एखाद्या राष्ट्रप्रमुखपेक्षाही एखादा अभिनेता असाही प्रभाव पाडू शकतो, याचे दर्शनही रजनीने घडवले आहे, असा करिष्माही फक्त रजनीचं घडवू शकतो.
गोपाळ जोशी – 9922421535