रथयात्रेसाठी भाजपची सुप्रीम कोर्टात याचिका

0

नवी दिल्ली : कोलकाता हायकोर्टाच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने भाजपच्या रथयात्रेला परवानगी नाकारली होती. यामुळे आता हायकोर्टाच्या या निर्णयाला भाजपने आव्हान दिलं असून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

कोलकाता कोर्टाने गेल्या आठवड्यात गुरुवारी भाजपच्या रथयात्रेला मंजुरी दिली होती. पण या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकारने हायकोर्टाच्या खंडपीठाकडे धाव घेत तात्काळ सुनावणी करण्याची मागणी केली होती. यानंतर राज्य सरकारच्या यंत्रणांच्या माहितीच्या आधारावर खंडपीठाने भाजपच्या रथयात्रेला परवानगी नाकारली होती. हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देबाशीष कारगुप्ता आणि शंपा सरकार यांच्या खंडपीठाने आधीचा निकाल रद्द करत हा निर्णय दिला होता.

पश्चिम बंगालच्या कूच बिहारमधून भाजपची रथयात्रा ७ डिसेंबरपासून सुरू होणार होती. पण यात्रेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने परवानगी नाकारल्यानंतर भाजपने हायकोर्टात याचिका केली होती. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात दाखल झालं आहे.