रथोत्सवाची परंपरा कायम : फैजपूरात पांडुरंगाचा जयघोष

0

फैजपूर : शेकडो वर्षांची रथोत्सवाची परंपरा कायम राखत शहरात पाच पावले रथ ओढून खुशाल महाराज देवस्थानाचा स्वयंभू पांडुरंग रथोत्सव सोमवारी साजरा करण्यात आला. यंदा उत्सवाचे 171 वर्ष होते. कोरोनामुळे उत्सवावर बंधने आली असलीतरी परंपरा अखंड राखत रथ गल्लीतील खुशाल महाराज देवस्थानाजवळ पाच पाऊले रथ ओढण्यात आला. प्रसंगी पांडुरंगाचा जयघोष करण्यात आला.

महामंडलेश्‍वर जनार्दन महाराजांची उपस्थिती
सोमवारी दुपारी चार वाजता देवस्थानात विधीत पांडुरंगाची पूजा करण्यात आल्यानंतर पांडुरंगाला रथावर विराजमान करण्यात आले. यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरी महाराज व महापूजेचे यजमान संतोष परदेशी व नीता परदेशी या दाम्पत्याने रथाची व पांडुरंगाची विीधवत पूजा केली. यावेळी देवस्थानचे गादीपती प्रवीणदास महाराज, पुंडलिक महाराज यांनी ही पूजा केली. उपस्थितांनी रथाला प्रदक्षिणा घालून पांडुरंगाचा जयघोष करीत रथ ओढला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी नगरसेवक राकेश जैन, डॉ.श्रीकांत कुलकर्णी, संकेत तांबट, दीपक सोनवणे, संदीप भारंबे, सुनील गोवे ,मनोज भावसार यांच्यासह रथगल्ली मित्र मंडळाचे पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. पौरोहित्य नंदू महाराज जोशी, विनोद जोशी, मोहन जोशी, केदार जोशी यांनी केले. रथाच्या अग्रस्थानी कलाशिक्षक राजू साळी यांनी भव्य रांगोळी साकारली तर गोपाळ तेली यांनी दरवर्षीप्रमाणे रथोत्सवात सामील भाविकांसाठी ‘मोतीचूरचे’ लाडू प्रसाद म्हणून वाटप केले. यावेळी फौजदार रोहिदास ठोंबरे, पोलिस कॉन्स्टेबल किरण चाटे, राजेश बर्‍हाटे, मोरे, अनिल महाजन, अमजद पठाण, विनोद पाटील यांच्यासह होमगार्ड यांनीही बंदोबस्त राखला.