मुंबई- भारतीय क्रिकेटमध्ये अनेकांना घडविणारे प्रशिक्षक रमांकात आचरेकर यांचे काल निधन झाले. आज त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये मुंबईतील अनेक क्रिकेटपटू आणि जाणकार उपस्थित होते. यावेळी सचिनने आपले गुरु आचरेकर सर यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी सचिन भावूक झाला होता.
आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या आचरेकर सरांनी भारतीय क्रिकेटमधील एका पिढीला घडवण्यात मोठा वाटा उचलला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू अशा अनेक खेळाडूंना आचरेकर सरांनी मार्गदर्शन केलं. आचरेकर सरांच्या दोन मुली आजही क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून नवीन मुलांना प्रशिक्षण देत आहेत.
दरम्यान, द्रोणाचार्य व पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या आचरेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याने सरकारला त्यांच्या कार्याचा विसर पडला असल्याची भावना क्रिकेटवर्तुळात व्यक्त होत आहे.