रमाकांत व चारू भालेराव यांना राष्ट्रीय नृत्यभूषण पुरस्कार

0

भुसावळ । कटक येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नाट्य व नृत्य महोत्सवात येथील राष्ट्रीय नाट्य संघाचे कलावंत यांनी आपल्या कथ्थक नृत्याचे सादरीकरण केले. ओडिसा राज्यातील कटक येथे उत्कल युवा सांस्कृतिक संघ, कटक जिल्हा प्रशासन आणि ओदिशा राज्य सांस्कृतिक व पर्यटन विभाग यांच्या संयुक्तरित्या आयोजित 25 व्या आंतरराष्ट्रीय नृत्य व नाट्य महोत्सवात भुसावळ येथील राष्ट्रीय नाट्य संघाचे कलाकार रमाकांत भालेराव व चारु भालेराव यांनी युगल नृत्यातून कथ्थक नृत्य प्रकारातील अर्धनारी नटेश्वर स्तुति तर प्रचिती कुलकर्णी हिने शास्रीय नृत्य प्रकारात श्री दत्त स्तुति आणि तोडे सादर केले. रोहिणी महाजन हिने लोकनृत्य प्रस्तूत केले.

देशभरातील कलावंतांचा सहभाग
या महोत्सवात रमाकांत व चारू भालेराव यांना इराण येथील कलावंतांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन राष्ट्रीय नृत्यभूषण पुरस्काराने तर प्रचिती कुलकर्णी आणि रोहिणी महाजन यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ने राष्ट्रीय नृत्यश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. या महोत्सवात देशातील काही कलावंतांसह अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इराण,इटली, जपान, स्पेन, मेक्सिको मलेशिया, नेपाळ, सौदी अरेबिया, सिंगापूर, थायलंड येथील कलाकारांनी कला सादर केली. येथील कलाप्रेमींनी पुरस्कार प्राप्त कलावंतंचे अभिनंदन केले आहे.

कला व सामाजिकतेचा सुरेख संगम…
भुसावळचे कलावंत बाहेर राज्यात कला सादरीकरण करण्यासाठी जात असताना सामाजिक दृष्टीकोन समोर ठेवून समाज सेवेचा प्रयत्न करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून कटक येथील दारिद्र्य रेषेखालील गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘अपना अंगण’ या शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन व लाडूंचे वाटप या महोत्सवाचे निमित्त साधून रमाकांत भालेराव,चारू भालेराव, प्रांजल कुलकर्णी, प्रचिती कुलकर्णी, ज्योत्स्ना कुलकर्णी, रोहिणी महाजन व नुपूर भालेराव या कलावंतांनी केले. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल कलाकारांनी समाधान व्यक्त करीत यापुढेही अशेच उपक्रम करण्याचा मनोदय व्यक्त केला.