रविवारी आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवींचे व्याख्यान

0

जळगाव। जळगाव रनर्स ग्रृप व रोटरी क्लब ऑफ जळगांव वेस्ट तर्फे उद्या रविवार 9 जुलै रोजी, खान्देश कन्या व आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी (मुबई ) यांचे व्याख्यान रोटरी भवन , मायादेवी नगर येथे सायंकाळी 6 वा. आयोजित केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.या पत्रपरिषदेला वैदांती बच्छाव, प्रेमलता प्रतापसिंग, डॉ.तृप्ती ज्ञानेश्‍वर बढे, डॉ.सीमा राजेश पाटील, डॉ.सिमरनकौर जुनेजा, अ‍ॅड. सुरज जहांगीर उपस्थित होते. जळगाव रनर्स गृप फेब्रुवारी 2016 ला स्थापन झाला आहे. आजरोजी 5 ते 65 वयोगटातील 170 सदस्य आहेत. त्यात 40 महिला सदस्य आहेत अशी माहिती देण्यात आली.

वयाच्या पन्नाशीत मॅरेथॉन सहभाग
डॉ.तृप्ती बढे आणि सीमा पाटील यांनी माहिती देतांना सांगितले की, क्रांती साळवी ह्या मुळच्या धळे येथील असून त्या अभियंता व गृहीणी आहेत. त्या वयाच्या 49 व्यावर्षी मॅरेथॉनमध्ये धावत आहेत. शालेय जीवनापासून त्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. शालेय जीवनात त्या 800 मिटरच्या मॅरेथॉनमध्ये धावत होत्या. परंतु, त्यांच्या धावण्यात मध्यंतरी सुमारे 20 वर्ष त्यात खंड पडला. 42 व्या वर्षी 2012 ला त्यांनी पुन्हा धावण्यास सुरवात केली. त्यांचा मुलगा धावतांना पाहुन पुन्हा त्यांनी धावण्याची तयारी केली. त्यामुळे 2012 ला मुंबई येथे अर्ध मॅरेथॉन 21 कि.मी. त्या धावल्या. एप्रिल 2017 मध्ये बोस्टन येथील मॅरेथॉनमध्ये त्या सहभागी झाल्या.

महिलांसाठी प्रेरणादायी उपक्रम
राज्य व राष्ट्रीयस्तरावरील मॅरेथॉनमध्ये त्या पहिल्या तीनमध्ये राहिल्या आहेत. गृहिणी, नोकरी सांभाळून त्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होवून यश संपादित केले आहे. आपल्या परिसरातील महिलांना धावण्याची माहिती होवून, त्यांना प्रेरणा मिळावी या हेतुने क्रांती साळवी यांचे दौड जिंदगीकी हे व्याख्यान आयोजित केले आहे. त्याचा लाभ नागरिकांनी बहुसंख्येने घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.