नवी दिल्ली । कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 300 विकेट घेणारा ऑफस्पिनर आर अश्विनचं अभिनंदन करताना श्रीलंकेचा माजी महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. अश्विन सध्याच्या काळातील जगातला सर्वश्रेष्ठ स्पिनर आहे अशा शब्दांमध्ये मुरलीधरनने अश्विनवर कौतुकाची थाप दिली. कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट घेणे म्हणजे मोठें यश आहे, अश्विन भारताच्या वन-डे संघात नाही, पण भारतासाठी वन-डे क्रिकेटमध्येही सातत्याने खेळून दमदार प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा मुरलीधरनने व्यक्त केली. अश्विन तुझा विक्रम मोडेल असं वाटतं का, या प्रश्नावर उत्तर देताना मुरली म्हणाला, अश्विन आता 31-32 वर्षांचा आहे. त्याच्यासमोर मोठं करिअर आहे, तो बरेच रेकॉर्ड बनवेल. अजून किमान चार ते पाच वर्षे तो खेळेल. तो कसं प्रदर्शन करतो आणि फिटनेस कशी राखतो यावर सर्वकाही अवलंबून असेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर वेळच देईल कारण 35 वर्षांनंतर खेळणं सोपं नसतं असं मुरलीधरन म्हणाला.
अश्विनने मोडला लीलीचा विक्रम
भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने सोमवारी श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात मिळवलेल्या विजयात सर्वांत वेगवान 300 बळी घेण्याचा डेनिस लिलीचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज लिलीने 1981 मध्ये 56 कसोटी सामन्यांत हा विक्रम नोंदवला होता. 36 वर्षांनंतर आश्विनने या विक्रमाला गवसणी घातली. आश्विनने विक्रमी कामगिरी करताना अनेक दिग्गजांना पिछाडीवर सोडले. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (58 कसोटी), रिचर्ड हॅडली, माल्कम मार्शल व डेल स्टेन (61 कसोटी) यांचा यात समावेश आहे.