रसिकांनी अनुभविला मराठमोळया गीतांचा लडीवाळ बाज

0

पुणे । मळयाच्या मळ्यामंदी कोण गं उभी, जा जा रानीच्या पाखरा, जीवा शिवाची बैल जोड यांसारख्या मराठमोळ्या गीतांच्या लडीवाळ बाजाचा सुरेल अनुभव रसिकांनी घेतला. तांबडी माती, कलावंतीण, पिंजरा, अमर भूपाळी, सांगत्ये ऐका, चंदनाची चोळी अंग अंग जाळी यांसारख्या दर्जेदार मराठी चित्रपटातील गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये तुझ्या प्रितीचे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गायिका राधा मंगेशकर, मधुरा दातार, विभावरी आपटे जोशी, प्रशांत नासेरी आदी कलाकारांनी सादरीकरण केले. यावेळी पं.हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर उपस्थित होते.

कलावंतीण चित्रपटातील राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या शोभा गुर्टू यांच्या आवाजातील पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने मैफलीची सुरुवात झाली. लटपट लटपट, तुम्हावर केली मी मर्जी बहाल यांसारख्या अनवट लावण्यांच्या सादरीकरणाने लावण्यांचे सुवर्णपान श्रोत्यांसमोर उलगडले. आनंदघन यांच्या संगीतरचनेने सजलेल्या तांबडी माती चित्रपटातील अनेक गीतांनी रसिकांच्या मनाच्या ठाव घेतला. तर, सांगत्ये ऐका चित्रपटातील लावण्यांचे सादरीकरण सर्व कलाकारांनी एकत्रपणे करीत लावण्यांचा रेशीमपट उलगडला. राजेंद्र साळुंखे, डॉ.राजेंद्र दूरकर, विशाल गडूतवार, अजय अत्रे, मुकेश देढीया, यश भंडारे, मिहिर भडकमकर यांनी साथसंगत केली. सोनाली श्रीखंडे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.