वाहतुकीची कोंडी सुटणार ; रस्त्याच्या मध्यभागी टाकणार दुभाजक
वरणगाव- बसस्थानक ते रेल्वेस्थानकाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून या रस्त्याचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नुकतेच झाले. रस्ता कामासाठी अडथळा ठरणारे बोदवड बसस्थानक बांधकाम विभागाने जमीनदोस्त केली असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. वरणगाव बसस्थानक ते रेल्वेस्थानकादरम्यान मोठे अतिक्रमण झाले होते मात्र रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व्यावसायीकांनी स्वतःहून अतिक्रमण काढले तसेच बोदवडकडे जाणार्या रस्त्यावर बसस्थानक हे पुरातन काळातील होते शिवाय या स्थानकामुळे काही लोकांनी अतिक्रमण केले होते तसेच या स्थानकामध्ये हॉटेल व भाजीपाल्याचा व्यवसाय केला जात होता. वाहतुकीला अडथळा ठरणार्या या स्थानकाला पाडून रस्त्याचे 24 मीटरचे रुंदीकरण करण्यात येणार असून मधोमध दुभाजक टाकले जाणार आहे तसेच विजेचे खांब टेलिफोनचे खांब हे देखील टाकले जाणार आहे यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे तसेच शहराच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे.
विद्यार्थ्यांची कोंडी सुटेल
वरणगाव बसस्थानक ते रेल्वेस्थानक दरम्यान शाळा, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय विश्रामगृह व रेल्वे स्थानक असल्याने या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. शाळा सुटतेवेळी तसेच भरतेवेळी येथून रस्ता काढणे विद्यार्थ्यांना जिकीरीचे होते परंतु सदरच्या रुंदीकरणामुळे विद्यार्थ्यांना रस्ता काढणे सोयीचे होऊन वाहतुकीची कोंडी सुटणार आहे.