रस्ता लुटीच्या अफवेने पोलिसांची धावपळ

0

जळगाव । यावल तालुक्यातील साकळी येथील पाच ते सहा तरुण खरेदीसाठी जळगावला आले होते. रात्री घराकडे परतत असताना ममुराबाद गावाच्या पुढे ट्रिपलसीट दुचाकीस्वाराची रिक्षाला धडक बसून अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही गटांतील तरुणांमध्ये तुंबळ हाणामारीही झाली. मारहाणीत गावातील स्थानिक तरुण असल्याने त्यांनी पळून जाताना दम दिल्याने साकळीच्या तरुणांनी मारहाण झाल्याचे घरच्यांना आणि जळगावातील नातेवाइकांना कळविल्याने रस्तालूट झाल्याची अफवा पसरली व पोलिसांची रात्रभर धावपळ उडाली.

यावल तालुक्यातील साकळी गावातील रहिवासी पाच ते सहा तरुण व एक लहान मुलगा ईदच्या खरेदीसाठी जळगावात आले होते. सायंकाळी त्यांनी गांधी मार्केट, फुले मार्केट परिसरात कपड्यांसह इतर खरेदी करुन रात्री ते साकळी येथे जाण्यासाठी निघाले. ममुराबाद ते विदगाव रोडवर साडेदहाच्या सुमारास समोरून भरधाव येणार्‍या दुचाकीस्वाराने रस्त्यावर नादुरुस्त उभ्या रिक्षाला धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील तिन्ही तरुण खाली कोसळल्याने वादाला सुरवात होऊन रिक्षातील तरुणांशी त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. दोन्ही गटाची आपसांत मारहाण होऊन दुचाकीस्वार तरुणांनी पळून जाताना तुम्ही गावाकडून या…तुम्हाला बघतोच आता असा दम दिल्याने रिक्षात प्रवास करणार्‍या तरुणांना पुढेही जाता येईना म्हणून त्यांनी यावल येथे फोन करून हाणामारी झाल्याची घटना कळवली. त्याचप्रमाणे तांबापुरातील नातेवाइकांना, आम्हाला दारूच्या नशेत तरुणांनी मारहाण केल्याचे सांगितल्याने एकच गोंधळ उडून नातेवाइकांनी पोलिस ठाणे गाठले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, निरीक्षक अशोक रत्नपारखी, शहर पोलिस ठाण्याचे डीबी पथकासह राखीव पोलिस दलाची तुकडी घटनास्थळाकडे रवाना झाली.उपविभागीय पोलिस अधिकारी सांगळे यांनी सत्यपरिस्थितीचा उलगडा केल्यावर तक्रारदार तरुणांनी माघार घेत घडला प्रकार सांगितल्याने वादावर पडदा पडला