रस्ता व गटारींसाठी अल्पसंख्याकांचा मनपावर मोर्चा

0

धुळे । येथील वडजाई रोड वरिल हाफिस सिद्दीकी नगरात महापालिकेंतर्गत दवाखाना उभारण्यात येऊन उद्घाटन करून औपचारिकता पार पाडली आहे. मात्र अद्याप दवाखाना सुरू झालेला नाही. तर या भागातील रस्ता व गटारींच्या कामाला मंजूरी मिळूनही प्रत्येक्षात कामांना सुरवात करण्यात येत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी हे कामे त्वरीत करण्यात यावे. या मागणीसाठी सोमवारी सकाळी 11 वाजता मनपा प्रांगणात भाजपा अल्पसंख्याक समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. हाफीज सिद्दीकी नगरात तत्कालीन महापौर जयश्री अहिरराव यांच्या कार्यकाळात दवाखाना तसेच डिलेव्हरी वार्डचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र अद्याप दवाखाना सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे महिलांना डिलेव्हरीसाठी शहरापासुन आठ कि.मी.लांब असलेल्या जिल्हा रूग्णालयात हाल करत जावे लागते. जिल्हा रूग्णालयापर्यंत जातांना अनेक दुर्घटना घडतात. याला जबाबदार कोण, असा सवाल यावेळी निर्देशन कर्त्यांनी केला.

परिसरात घाणीचे साम्राज्य : या परिसरात वाड क्र.35 रस्ते व गटारींचे काम मंजूर झाले असून कृती मात्र शुन्य आहे. त्यामुळे परिसरात गटारीं अभावी अतिशय घाण व दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. तरी या परिसरातील काम का अडवून ठेवले आहेत याची आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असून मोर्चात भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अन्सारी रईस अ.कादरी, मुक्तार अन्सारी, पालिल मन्यार, शादाब हुसेन, शोएब शे.मोहम्मद, नुर मोहम्मद, इसराईल खान, इब्राहिम खान यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकरांनी मनपा कारभाराचा निषेध करत मनपा विरूद्ध नारेबाजी केली.