वाहतुकीच्या नियमांबद्दल केली जनजागृती
पिंपरी : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रबोधन कार्यक्रम पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकताच संपन्न झाला. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन मंडळाचे आनंद पाटील, परिवहन अधिकारी सचिन विधाते, सहायक निरीक्षक संदीप गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे विश्वस्त महेशभाई शहा, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे, डॉ. ललितकुमार वधवा, प्रा. शैलेंद्र मोरे, विद्यार्थी विकसन अधिकारी प्रा. विजय नवले, आदी उपस्थित होते.
वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत
अत्यंत प्राथमिक पण महत्वपूर्ण मुद्दे सांगताना परिवहन मंडळाचे आनंद पाटील म्हणाले की, वाहतुकीचे नियम हे स्वतःसाठी तसेच इतरांसाठी अत्यंत उपयोगाचे असतात. ते सर्वांनीच पाळावेत. अपघातामुळे मोठी हानी होते. पादचार्यांनी पादचारी मार्गाचा वापर करावा. तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा. तर चारचाकी चालकांनी सीट बेल्टशिवाय वाहन चालवू नये. सचिन विधाते म्हणाले की, अपघातातून होणारे मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. अनेक अपघातांचे कारण वाहनचालक असतात आणि नियम तोडल्यास अपघाताची शक्यता वाढते. वाहनचालकाने सुज्ञपणा दाखवल्यास आणि शिस्तीचा अवलंब केल्यास अपघात टाळणे शक्य आहे. रस्त्यावरची पहिली चूक ही आयुष्यातील शेवटची चूक असू शकते.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. विजय नवले यांनी केली. सूत्रसंचालन प्रा. अर्चना भसे यांनी केले तर आभार प्रा. रामदास बिरादार यांनी केले. प्रा. हृषीकेश पांडे, सोमनाथ शेंडगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.