रस्ते अपघातातील जखमींना 30 हजार रूपये खर्च मिळणार

0

मुंबई : राज्यातील महामार्ग, तसेच विविध रस्त्यावर दररोज अपघात होत असतात. त्या अपघातातील जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो तर अनेकांना अपंगत्व येते. त्यामुळे अशा जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारकडून 30 हजार रूपयांचा खर्च मिळणार आहे. आरोग्य विभागाकडून ही योजना तयार करण्यात आली असून, सरकारच्या मंजुरीनंतर लागू होणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील जखमींसह इतर राज्यातील जखमींनाही मिळणार आहे. त्यामुळे सरकारकडून लवकरच रस्ते अपघातातील जखमींना दिलासा मिळणार आहे.

कर्नाटकमध्ये जखमींच्या उपचारासाठी अशी योजना लागू आहे त्याच धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात सुरू करण्याची घोषणा आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसारच आरोग्य विभागाला प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. आरोग्य विभागाकडून असा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, राज्य सरकारकडे तो मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर ही योजना लागू होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विमा कवच असे या योजनेला नाव देण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.

जखमी रुग्णांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून वा खासगी रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. अपघातातील रुग्णावर तीन दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचार मिळणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी वयाची अट असणार नाही. तसेच रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तिला कोणत्याही अधिवास प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. दुसर्‍या राज्यातील व्यक्ती रस्ते अपघातात जखमी झाल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. मागील तीन वर्षात राज्यात सुमारे 1.9 लाख रस्ते अपघात झाले आहेत. त्यात सुमारे 38 हजार 209 व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे तर 1.2 लाख व्यक्ती जखमी झाले आहेत. त्यामुळे रस्ते अपघातातील जखमींना दिलासा मिळणार आहे.