पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) रस्ते खोदाईसाठी प्रति मीटरला 2 हजार 350 रुपये इतके सवलत शुल्क महापालिका आकारणार आहे. याबाबत नागपूर महापालिकेच्या धर्तीवर महापालिका महावितरण कंपनीसोबत कामासाठी सामंजस्य करार करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला आहे.
शहर हद्दीतील रस्त्यांमधून भूमिगत सेवावाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेकडून विविध शासकीय, निमशासकीय, तसेच खासगी कंपन्यांकडून रस्ता खोदाईसाठी परवानगी दिली जाते. रस्ते दुरुस्तीसाठी प्रति मीटरला सरासरी 6 हजार 500 रुपये आणि महापालिका अधिभार सरासरी 3 हजार रुपये असे एकूण 9 हजार 500 रुपये आकारले जातात. शहरात खोदलेले रस्ते दुरुस्तीसाठी प्रचलित दरानुसार खर्च महापालिका संबंधित कंपनीकडून आगाऊ रक्कम वसूल करते. खोदलेल्या रस्त्यामुळे वाहतुकीस होणारा अडथळा व अपघात टाळण्यासाठी महापालिका त्वरित निविदा प्रक्रिया राबवून रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात येतात.
रस्ते खोदाईस आकारले जात होते दीड हजार रुपे
महावितरणची केबल टाकण्यासाठी ऊर्जामंत्र्यांच्या 23 जानेवारी 2010 च्या निर्णयानुसार प्रति मीटरला रस्ते खोदाईस दीड हजार रुपये शुल्क आकारले जात होते. रस्ते दुरुस्ती व महापालिका अधिभार धरून प्रति मीटरसाठी हे शुल्क वाढवून 2 हजार 300 रुपये करण्याचा निर्णय महापालिकेच्या आयुक्तांच्या प्रस्तावानुसार 10 फेब्रुवारी 2015 ला घेण्यात आला. त्यानुसार सध्या महापालिका महावितरणला शुल्क आकारत आहे. मात्र, या संदर्भात निश्चित धोरण नसल्याने गेल्या 2016 -17 या आर्थिक वर्षात केवळ 1.15 किलोमीटर रस्ते खोदाईस महापालिकेने परवानगी दिली आहे. चालू 2017-18 या आर्थिक वर्षात केवळ 0.1 किलोमीटरची खोदाई महावितरणकडून करण्यात आली आहे.
असा आहे प्रस्ताव
पुणे महापालिकेने महावितरणकडून प्रति मीटरसाठी 2 हजार 350 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महावितरणाच्या पुणे परिमंडळाने 24 नोव्हेंबर 2017 च्या पत्रानुसार 2 हजार 350 रुपये प्रति मीटर दराने एकूण 70.16 किलोमीटर अंतर उच्चदाब वाहिनी आणि 28.35 किलोमीटर अंतर लघुदाब वाहिनीसाठी रस्ते खोदाईची परवानगी मागितली आहे. त्याअनुषंगाने नागपूर महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका महावितरणसोबत सामंजस्य करार करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.