रस्ते डांबरीकरणाचे सर्व विषय स्थायी समिती सभेमध्ये तहकूब

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या स्थायी समितीने रस्ते डांबरीकरणाचे विषय तहकूब केले आहेत. प्रशासनाने अगोदर मंजुरी दिलेल्या रस्त्यांची कामे सुरु करावीत. त्यानंतर नवीन विषयांना मंजुरी दिली जाईल, अशी भुमिका स्थायी समितीने घेतली. महापालिकेच्या समाविष्ट गावांतील पर्यायी रस्त्यांच्या विकासासाठी स्थायी समितीने पंधरा दिवसांपूर्वी 425 कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. त्यामध्ये रस्त्यांवर डांबरीकरण, मजबुतीकरण, डीपी रस्ते विकसित करणे याचा समावेश होता.

ज्योतिबानगर, सांगवी किवळेची कामे थांबली
प्रभाग क्रमांक 12 येथील ज्योतीबानगर, सोनवणे वस्ती येथील 24 मीटरचा डीपी रस्ता रुंदीकरण करुन स्टाँर्मवाँटर लाईन टाकून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार होते. याचे काम मे.एस.के.येवले ऍन्ड कंपनी या ठेकेदाराला आणि त्यासाठी येणार्‍या एक कोटी 95 लाख 86 हजार रुपयांना मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीसमोर होता. मात्र तो तहकूब करण्यात आला आहे. तसेच महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडील सांगवी किवळे बीआरटीएस रस्त्यावरील जगताप डेअरी साई चौक ते मुकाई चौका पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार होते. याचे काम मे.एस.के.येवले ऍन्ड कंपनी या ठेकेदाराला आणि त्यासाठी येणा-या दोन कोटी 66 लाख 10 हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्याचा विषय स्थायीसमोर होता. मात्र हे दोन्ही विषय स्थायी समितीने तहकूब ठेवले आहेत.

महावितरणसोबतचा करारही तहकूब
त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) वतीने केबल खोदाईसाठी प्रति मीटरला 2 हजार 350 रुपये सवलत दरामध्ये शुल्क पिंपरी-चिंचवड महापालिका आकारणार आहे. याबाबत नागपूर महापालिकेच्या धर्तीवर महापालिका महावितरण कंपनीसोबत कामासाठी सामंजस्य करार करणार होती. याबाबतच्या प्रस्ताव देखील स्थायी समितीने तहकूब ठेवला आहे.

38 कोटींच्या विकासकामांना मान्यता
विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 38 कोटी 65 लाख 65 हजार रुपयांच्या खर्चास मात्र बैठकीत मान्यता देण्यात आली.
काळेवाडी फाटा ते देहू आळंदी या बीआरटीएस कॉरीडॉर गँट्री करणेकामी येणा-या सुमारे एक कोटी 66 लाख 14 हजार रुपयांच्या खर्चास, कासारवाडी फेज एक करीताचे मैलापाणी पंप हाऊस काळेवाडी व पिंपळे सौदागर पंप हाऊसचे वार्षीक चालन देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी येणा-या सुमारे एक कोटी 48 लाख 93 हजार रुपयांच्या खर्चास, चिंचवड एस.बी.आर. मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत येणा-या मैला पंप हाऊसेसचे चालन देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी (गोखले पार्क, काकडे पार्क, केशवनगर, देऊळमळा) येणा-या सुमारे 2 कोटी 35 लाख 93 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन
के.एस.बी.चौक ते चिंचवड स्टेशन या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे एक कोटी 94 लाख 13 हजार रुपयांच्या खर्चास, दिघी मधील साई पार्क, आदर्शनगर, कृष्णानगर, भारतमाता नगर इत्यादी ठिकाणीचे उर्वरीत रस्ते डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे 70 लाख 63 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

जलनि:सारणासाठी दीड कोटी
रावेत मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत मामुर्डी, किवळे, रावेत या उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकणे व जलनिःसारण विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 70 लाख 59 हजार रुपयांच्या खर्चास, रावेत मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत रावेत, किवळे येथे मुख्य जलनिःसारण नलिका टाकण्यासाठी येणा-या सुमारे 95 लाख 38 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.