रस्ते दुरुस्तीकामांच्या दर्जाची पुन्हा तपासणी करणार

0

अमरावती । राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम येत्या 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. जिल्ह्यातील राज्य मार्गांच्या दुरुस्तीचे 92 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम तत्काळ पूर्ण करावे. ही कामे दर्जेदार असल्याचे परिसरातील नागरिकांकडून प्रमाणित करुन घ्यावे. मी स्वत:ही अधिवेशनानंतर या कामांची पुन्हा तपासणी करणार आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभियंत्यांना येथे दिले. राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत असून, सार्वजनिक बांधकाम मंत्री सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन कामांचा आढावा घेत आहेत.

अमरावतीतील 92 टक्के कामे पूण
जिल्ह्यातील राज्य मार्ग रस्त्यांची 92 टक्के कामे पूर्ण झालीत, हे कौतुकास्पद असल्याचे सांगून श्री.पाटील म्हणाले की, विभागामार्फत पश्चिम विदर्भात सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्चून महामार्गाचे काँक्रिटीकरण सुरु आहे. महामार्ग व राज्य महामार्गावर खड्डे पडण्याची अनेक कारणे समोर आली आहेत.निधीची कमतरता, अद्ययावत यंत्रणा उपयोगात न आणणे, कमी क्षमता असणार्‍या रस्त्यांवरुन जड वाहनांची वाहतूक, पावसाळ्यातील नैसर्गिक बाबी आदींमुळे रस्ते नादुरुस्त होतात. येत्या 15 डिसेंबरपर्यंत सर्व प्रमुख महामार्ग, राज्य मार्गांवरील खड्डे बुजविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक अभियंत्याकडे मंडळनिहाय रस्त्यांची जबाबदारी सोपविण्यात आली असून, नियंत्रणाची जबाबदारी वरिष्ठ अधिकार्‍यांवर आहे. त्याशिवाय, कामे पूर्ण झाल्याची छायाचित्रे जिओ टॅगिंगच्या माध्यमातून मंत्रालय वॉररुमला पाठविण्यात यावी. रस्ते दुरुस्तीत उत्तम कामगिरी करणार्‍यांना बक्षीसेही देण्यात येणार आहेत. आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पदोन्नतीसंबंधी अनुशेष भरुन काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

खड्डे बुजविण्याची प्रक्रिया पूर्ण
यावेळी अधिक्षक अभियंता श्री. साळवे यांनी जिल्ह्यातील कामांबाबत सादरीकरण केले. जिल्हयात प्रमुख राज्य मार्ग रस्त्यांची लांबी 1629 किमी आहे. सुमारे 556 किमी लांबीच्या रस्ते नादुरुस्त होते. त्यातील 510 किमी लांबीच्या रस्त्यांवर खड्डे बुजविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या कामांची 92 टक्केवारी आहे, असे श्री. साळवे म्हणाले. बैठकीच्या शेवटच्या सत्रात श्री. पाटील यांनी अभियंत्यांशी विभागाच्या विकासासाठी नव्या संकल्पना, नवीन संशोधन याबाबत सुसंवाद साधला. यावेळी मोबाईल फील्ड लॅबचा (क्षेत्रीय प्रयोगशाळा फिरते पथक) शुभारंभही यावेळी झाला.

आदर्शवत रस्ते बांधण्याला प्राधान्य
यवतमाळ । रस्ते हा विकासाचे केंद्रबिंदू आहे. नागरिकांना ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता असते, त्यात रस्त्यांचा समावेश होतो. रस्ते पाहून लोकांकडूनच कौतुकाची थाप मिळाली पाहिजे, असे आदर्शवत रस्ते बांधण्याला सरकारचे प्राधान्य आहे. त्यासाठी विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या सहकार्याने हे कार्य पार पाडले जाईल, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम, महसूल तसेच मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात अभियंत्यांसह सुसंवाद साधताना ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभाग हे शासनाचे प्रमुख अंग आहे, असे सांगून ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक जिल्हा स्तरावर जाऊन विभागातील अधिकारीकर्मचार्‍यांच्या अडीअडचणी, रस्त्यांची परिस्थिती तसेच त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजना आदी समजून घेण्याचा तसेच सुसंवाद साधण्याचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील 36 जिल्ह्यापैकी यवतमाळ येथील दौरा हा 26 वा आहे.