चाळीसगांव : रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी सहकार्य करा, सगळे मिळून ग्रामीण भागाचा विकास करु, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले. पाचोरा, भडगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून 17.37 लक्ष खर्चाच्या वरखेडी-सावखेडा रस्त्याचा लोकार्पण सोहळा वरखेडी ता.पाचोरा येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री ना.पाटील म्हणाले, गेल्या बर्याच वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झालेली होती. जिल्ह्यातील प्रसिध्द यात्रोत्सवापैकी एक असलेल्या भैरवनाथांच्या यात्रेस सुरवात होत असून, या झालेल्या रस्त्याच्या कामामुळे जनतेला दिलासा मिळणार आहे.
दौर्यात केले विविध विकास कामांचे उद्घाटन
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून राज्यात एकाचवेळी 730 कि.मी. लांबीचे नवीन रस्ते तर 30 हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे सुधारीकरण करण्यात येत असून रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 2019 पर्यंत रस्त्यांबाबत महाराष्ट्राची स्थिती बदलेल. रस्त्यांची कामे करत असताना नवीन भूसंपादन केले जाणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील जे रस्ते आहेत त्यांचा वापर केला जाईल. मात्र त्यावरील अतिक्रमणे काढली जातील. यासाठी नागरीकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. याबरोबरच या कामांसाठी गुणवत्तेच्या आधारावर ई-टेंडरद्वारे कंत्राटदार निर्धारीत केले जातील. त्यात कोणीही ढवळाढवळ करु नये. कंत्राटदारांकडून कामे गुणवत्तापूर्ण होत आहेत किंवा नाहीत याचीही जनतेने पाहणी करावी. चांगल्या कामासाठी सहकार्य करा, राज्याला निधीची कमतरता नाही, आवश्यक सर्व बाबी पूर्ण केल्या जातील, सगळे मिळून विकास करु, जनतेने बदल सर्वार्थाने स्वीकारावा, असेही ना.पाटील यांनी यावेळी सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेळी सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सावखेडा-चिचफाटा, लोहारी-वाणेगांव या रस्त्यांचे भुमीपूजन करुन लोहारी गावातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा ना.पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार किशोर पाटील, सावखेड्याचे सरपंच किरण पाटील, माजी सरपंच गोकुलसिंग परदेशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुकाप्रमुख दीपकसिंग राजपूत, ज्ञानेश्वर सोनार माजी जि.प.सदस्य उध्दव मराठे, तहसिलदार दिपक पाटील, सार्वजानिक बांधकाम विभागाचे अभियंता डी.एम.पाटील, ईश्वर परदेशी, सुनिल जाधव, वरखेडीचे ग्रा.पं. सदस्य जगदीश चौधरी, विजय भोई, दिपक बागुल यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.