भोर । पुणे जिल्हा परिषदेच्या भोलावडे-नसरापुर गटात जिल्हा परिषद निधीतून 1 कोटी 53 लाख रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, ही कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गट नेते विठ्ठल आवाळे यांनी दिली. जि. प.च्या गटातील भोलावडे-नसरापुर आळंदेवाडी येथील रस्ता मजबुती करणासाठी 35 लाख, लव्हेरी येथील रस्ता मजबुतीकरणासाठी 30 लाख, इंगवली-आळंदे ते आळंदेवाडी रस्त्याचे कामांसाठी 35 लाख, भाटघर धरण जलाशय भागातील तळे म्हसवली रस्ता मजबुतीकरणासाठी 30 लाख, खुटवड वस्ती ते उंबरे येथील रस्ता मजबुतीकरणासाठी 23 लाख अशी एकूण 1 कोटी 53 लाख रुपये खर्चाची कामे मंजूर करण्यात आली असून, या कामांसाठीचा निधी उपलब्ध झाला आहे. ही सर्व मंजूर कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे विठ्ठल आवाळे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केल्या जाणार्या विविध विकासकामांच्या संदर्भात माहिती देताना आवाळे म्हणाले की, भोर तालुक्यात नेरे, राऊतवाडी, धावडी, पाले, करंदी, जायखिंड, खोपी, कांजळे आदी ठिकाणच्या रस्त्यांची कामे आणि नेरे, हिर्डोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांना मंजुरी मिळवण्याचे काम मागील पंचवार्षिकमधील काँग्रेसच्या सदस्यांनीच केले आहे. याचे श्रेय आता दुसरेच काही लोक घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कामाचे श्रेय कोणी घेऊ नये, असे कोणाचेही नाव न घेता त्यांनी सूचित केले.