रस्त्याच्या खड्ड्यात अडकला ट्रक

0

तळोदा । पा लिकेकडून एक महिन्या पूर्वी मेन रोडच्या गटारींचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने गटारीवरील स्लॅबला भगदाड पडुन मालाने भरलेल्या ट्रकचे चाक अडकुन मेन रोड वरील वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना वाहतुक कोंडीला समोरे जावे लागले. एक महिन्यांपूर्वी तळोदा शहरात पालिकेने मेन रोड वरील गटारींचे बांधकाम नव्याने केले आहे. यात दोन्ही बाजूच्या जुन्या गटारी खोदून त्या जागी नव्या गटारी बांधून स्लॅब टाकून झाकण्यात आल्या आहेत. यात ठिकठिकाणी रोडच्या मधून जाणार्‍या गटारी सुद्धा नव्याने बनविण्यात आल्या.

मोठ्या वाहनांची वाहतूक बंद
परंतु त्यावरील काँक्रीटचे काम निकृष्ट दर्जाचे केलेले असल्याने आज सकाळी नगरपालिके समोरील भर बाजारपेठेतील गटारी वरून मालाने भरलेला ट्रक जात असतांना गटारी वरील स्लॅब कोसळून भगदाड पडून ट्रकचे चाक गटारीत जाऊन अडकली. गटारीत पडल्याने ट्रक पुढे किंवा मागे सुद्धा होत नसल्याने मोठ्या वाहनांची वाहतूक बंद झाली. अडकलेला ट्रक एका बाजूला झुकला. सुदैवाने ट्रक पलटी झाला नाही. यामुळे जीवित वित्त हानी टळली. ट्रक भररस्त्यात अडकून पडल्याने आज सकाळ पासूनच येथील वाहतूक खोळंबली होती.

ठेकेदाराच्या कामांच्या दर्जाबाबत शंका
दोन दिवसांपूर्वी सुद्धा स्वामी समर्थ मंदिरासमोरील मेन रोड वर पाईप लाईनच्या खड्यात डंपरचे चाक फसून पाईप लाईन फुटली होती. यात दत्त मंदिर पर्यंत मेन रोड वर दिवस भर पाणी होऊन चिखल झाल्याने वाहतूक बंद झाली होती. सध्या तळोदा पालिकेचे सुरू असलेली सर्व कामे एकच ठेकेदार करीत असून त्यात चिनोदा चौफुली ते फॉरेस्ट ऑफिस पर्यन्त रस्त्याचे दुहेरीकरण, मेन रोड चा हातोडा नाक्या पर्यंतचा रस्ता आदी कामांचा समावेश आहे संबंधित ठेकेदार पालिकेच्या समोरचीच गटार निकृष्ट दर्जाचे बनवत असेल तर इतर कामांचे काय ? असा प्रश्न या निमित्ताने तळोदेकरांना पडला आहे.

दुसर्‍या ट्रकमध्ये भरला माल
रस्त्यात ट्रक अडकल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. दुसरा ट्रक आणून त्यात रस्त्यात मध्ये अडकलेल्या ट्रक मधील माल खाली करण्यात आला. हलका झाल्यावर गटारीत अडकलेला ट्रक काढण्यात यश आले. तळोद्याच्या मेन रोडच्या आजूबाजूच्या व रस्त्यांमधील जुन्या गटारी खोदून निकृष्ट दर्जाचे सिमेंट काँक्रीट टाकून गटारी नव्याने बांधण्यात आल्या. या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत तेथील रहिवाश्यांनी वेळोवेळी पालिकेच्या मुख्याधिकारी व अभियंत्याकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु त्या तक्रारींना केराची टोपली दाखविली गेली. म्हणून ठेकेदाराने या गटारी निकृष्ट दर्जाच्या बांधल्याने एका महिन्यातच गटारिना भगदाड पडू लागल्या आहेत.