रस्त्यात कबड्डी खेळण्याच्या वादातून दोन गट भिडले

Clash between two groups in Ajnad : Two injured ; Contradictory offense रावेर : तालुक्यातील अजनाड येथे रस्त्यावर कबड्डी खेळणार्‍या मुलांना हटकल्याच्या रागातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी रावेर पोलिसात परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटाच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या तुंबळ हाणामारीत दोन जण जखमी झाले. रविवार, 21 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.

एकास मारहाण : तिघांविरोधात गुन्हा
पहिल्या गटातर्फे तक्रारदार अतुल शंकर बेलदार (20, अजनाड, ता.रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मोठ्या भावाने रस्त्यावर खेळणार्‍या मुलांना येथे खेळू नका, असे हटकले असल्याचा संशयीतांना राग आल्याने त्यांनी अतुल बेलदार यांना शिविगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी विशाल प्रल्हाद बेलदार, प्रल्हाद देवराम बेलदार, संदीप प्रल्हाद बेलदार (सर्व रा.अजनाड., ता.रावेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक नितीन डाबरे करीत आहेत.

दुसर्‍या गटातर्फे तक्रार : तिघांविरोधात गुन्हा
दुसर्‍या गटातर्फे विशाल प्रल्हाद बेलदार (20, अजनाड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी संदीप शंकर बेलदार, अतुल शंकर बेलदार व शंकर धोंडू बेलदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीचा आशय असा की, फिर्यादी विशाल हे संशयीत सुभान बेलदार यांच्या घराजवळ कबड्डी पाहत असताना संशयीताने येथे कबड्डी खेळू नका, असे सांगितले असता मी कबड्डी खेळत नाही, लहान मुलांना सांग, असे सांगितल्याचा तिघा संशयीतांनी लोखंडी रॉड मारला तसेच शिविगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तपास नाईक नितीन डांबरे करीत आहेत.