पिंपरी-चिंचवड : शहरातील चौका-चौकात असलेल्या टपर्या, हातगाड्या यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अशा टपर्या व हातगाड्यांचे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केली पाहिजे. हे अतिक्रमण जे व्यावसायिक काढणार नाहीत, त्यांच्यावर महापालिकेनेच कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सिग्नलच्या कामातील अडी-अडचणींबाबत महापालिकेचे बीआरटीएस अभियंते आणि वाहतूक पोलिसांची सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत राजेंद्र भामरे बोलत होते.
यांची होती उपस्थिती
या बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याकरिता सुधारणेसाठी ट्रॅफिक सिग्नल या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीला सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे, वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक, सहशहर अभियंता प्रवीण तुपे, क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, चंद्रकांत खोसे, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता डी. आर. जुंधारे उपस्थित होते.
प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला सभा
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध चौकात असलेल्या टपर्या व हातगाड्या यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यास अडथळा निर्माण होत असून, त्यावर महापालिकेने कारवाई करावी, असे सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी सांगितले. महापालिकेच्या अधिकार्यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमणाबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. तसेच वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा केलेल्या व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला वाहतूक विषयक सभा घेण्यात यावी, असे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी सांगितले.