पालिकेची कठोर कारवाई : 5 लाख 29 हजार 635 रुपयांचा दंड वसूल
पुणे : सार्वजनिक ठिकाणी घाण करणार्या नागरिकांवर पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचार्यांना अस्वच्छता पसरविणार्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार 2 ते 23 नोव्हेंबर या दरम्यान पालिकेकडून तब्बल 2,858 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 5 लाख 29 हजार 635 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या 1,713 नागरिकांकडून 2 लाख 97 हजार 165 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच या सर्व नागरिकांकडून चक्क रस्ता साफ करून घेण्यात आला. याच कालावधीत कचरा फेकणार्या 1,101 नागरिकांकडून 2 लाख 24 हजार 660, सार्वजनिक ठिकाणी लघवी करणार्या 42 जणांकडून 6 हजार 810 तर शौचास बसणार्या 2 जणांकडून 1000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
थुंकणार्यांची संख्या सर्वाधिक
सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून अनेकदा अस्वच्छता पसरवली जाते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांची संख्या तर सर्वाधिक आहे. या अस्वच्छता पसरविणार्या नागरिकांमुळे शहर विद्रुप होत असते. शहराचे घोषवाक्य हे स्वच्छ पुणे सुंदर पुणे असे आहे. त्यामुळे हे घोषवाक्य सत्यात उतरविण्यासाठी पुणे महानगरपालिका आता सज्ज झाली आहे. पालिकेकडून अस्वच्छता पसरविणार्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा फेकणे, लघवी करणे, शौचास बसणे आदी गोष्टींसाठी कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेकडून मोहिमच हाती घेण्यात आली असून प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचार्यांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे.
750 अधिकार्यांची नेमणूक
शहरात अस्वच्छता पसरविणार्या नागरिकांवर 2 नोव्हेंबरपासून पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. सध्या 6 लाखापर्यंत दंड वसूल करण्यात आला आहे. दंड हा प्रतिकात्मक आहे. नागरिकांमध्ये जागृती व्हावी व त्यांनी पुण्याला स्वच्छ ठेवण्यास पालिकेला मदत करावी या हेतूने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छ पुणे सुंदर पुणे या मोहिमेसाठी सध्या तब्बल 750 अधिकार्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या कारवाईमुळे शहरात चांगलाच गुणात्मक फरक पडलेला दिसून येत आहे. यापुढील काळात देखिल ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवावी तसेच घरातील कचरा ओला व सुका असा वेगळा करून पालिकेकडून नेमण्यात आलेल्या स्वच्छ संस्थेच्या कर्मचार्यांना द्यावा. तसेच ज्यांच्या घरी हे स्वच्छचे कर्मचारी कचरा घेण्यासाठी येत नाहीत त्यांनी त्यांच्या घराजवळील आरोग्य कोठीला भेट देऊन याबाबतचा अर्ज करावा.
ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग