उरण । कोप्रोलीच्या आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांचा आणि काळंबुसरे व मोठी जुई येथील शेतकरी ग्रामस्थांचा शेकडो वर्षांचा पारंपारिक वहिवाटीचा रस्ताच एका खाजगी कंपनीने जमीन विकत घेऊन केलेल्या गोदामाच्या बांधकामामुळे अडविला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या विरोधात सुमारे 19 आदिवासी आणि स्थानिक शेतकरी यांनी उरणच्या तहसीलदारांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत 9 विविध ठिकाणी पत्रव्यवहार करून रस्ता अबाधित राहावा अशी मागणी केली आहे. या संदर्भात तहसीलदार कल्पना गोडे यांनी येत्या शनिवारी या संदर्भात तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती रत्नाकर राऊत यांनी बोलताना दिली आहे.
कारवाईची मागणी
खोपटा परिसरातील अनेक कांदळवणाच्या जागांवर ही भराव करून थेट एमटी कंटेनर यार्ड उभे करणार्यांवर कारवाई करण्यात महसूल विभागाला अद्याप तरी यश आलेले नाही. आता पुन्हा एकदा तालुक्याच्या ग्रामीण भागात कळंबुसरे कोप्रोली मार्गावरील मोठी जुई पापटा जवळ या परिसरातील नव्याने वसविण्यात येत असलेल्या गोदामाच्या निमित्ताने कोप्रोलीच्या आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांचा आणि काळंबुसरे व मोठी जुई येथील शेतकरी ग्रामस्थांचा शेकडो वर्षांचा पारंपारिक वहिवाटीचा रस्ता अडविण्याचा घाट घातला गेला आहे. या ठिकाणी नव्याने निर्माण होणार्या दादाजी धाकजी इंदुलकर लाँजिस्टीक नावाच्या नव्या गोदामाच्या निमित्ताने रस्ता अडविण्याचा घाट घातला गेला आहे. या भागातूनच सर्व्हे नंबर 122 मधून कोप्रोलीच्या आदिवासी बांधवांचा आणि काळंबुसरे व मोठी जुई गावच्या ग्रामस्थाचा पारंपारिक वहिवाटीचा रस्ता आहे.