रहदारीला अडथळा ठरणारी 3 हजार वाहने जप्त

0

मुंबई : मुंबई महापालिका विभागातील सार्वजनिक जागी किंवा रस्त्यावर सोडून दिलेली वाहने महापालिकेतर्फे नेहमी जप्त करण्यात येतात. यानुसार 1 जानेवारी 2016 ते 30 जून 2017 या दरम्यान 3 हजार 418 वाहने जप्त करण्यात आली होती. यापैकी 2 हजार 747 वाहने सोडवून घेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे या वाहनांचा नुकताच लिलाव करण्यात आला. या लिलावातून महापालिकेला 95 लाख 96 हजारांचा महसूल प्राप्त झाला. तर याच कालावधी दरम्यान संबंधितांद्वारे सोडविण्यात आलेल्या 612 वाहनांच्या दंडापोटी महापालिकेला 46 लाख 26 हजार 390 रुपयांची प्राप्ती झाली आहे.

पडीक वाहनांच्या टपावर किंवा वाहनांमध्ये पाणी साचून त्यात डेंग्यू-मलेरियाचा प्रसार करणार्‍या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी वाहने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलने खात्याद्वारे जप्त करण्यात येतात. यंदाच्या वर्षी 2 हजार 217 दुचाकी, 300 तीनचाकी आणि 901 चारचाकी वाहनांचा समावेश होता. यापैकी 612 वाहने दंड भरुन संबंधितांद्वारे सोडवून नेण्यात आली. या दंडापोटी संबंधितांनी 46 लाख 26 हजार 390 रुपये एवढी रक्कम महापालिकेकडे जमा केली. या 612 वाहनांमध्ये 193 दुचाकी, 50 तीनचाकी; तर 369 चारचाकी वाहनांचा समावेश होता.