रहाटणीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

0

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – रहाटणी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पाणी टंचाईवर महापालिकेने त्वरित तोडगा काढावा. अन्यथा आयुक्तांच्या निवासस्थानी पाणी भरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. याबाबत शिवसेनेचे रहाटणी काळेवाडी प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. प्रस्थापित नगरसेवकांच्या आडमुठ्या धोरणामुळे महाराष्ट्रनगरी, गजानन नगर, वृंदा कॉलनी व संत तुकडोजीनगर आदी परिसरात मागील महिन्यापासून पाणी टंचाई जाणवत आहे.

नागरिकांची मोठी गैरसोय
येथील पाणी पुरवठा जाणीवपूर्वक विस्कळीत व अनियमित राखला जात आहे. पाणी कमी दाबाने येणे व लवकर बंद होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. विशेषतः महिलावर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आयुक्तांनी त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा शिवसेना आयुक्तांच्या निवासस्थानातून पाणी भरो आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.