रहाटणीमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

0

6671 चौरस फुट बांधकाम पाडले

रहाटणी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्यावतीने काळेवाडी व रहाटणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. मध्यंतरी काही काळ थंडावलेली पालिकेची अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काळेवाडीमधील प्रभाग क्र. 22 व रहाटणीमधील एका अनधिकृत आरसीसी बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 6671 चौ. फुटांचे बांधकाम पाडण्यात आले.

5 अनधिकृत बांधकामांवर कारवाई
काळेवाडी आदर्शनगर, विजयनगर परिसरातील अंदाजे 3802 चौरस फुटांची तीन आरसीसी वाढीव बांधकामे पाडण्यात आली. तसेच एक नवीन आरसीसी 1000 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. तर रहाटणी परिसरातील अंदाजे 1600 चौरस फुटांचे एक आरसीसी बांधकाम पाडण्यात आले. तसेच एका मोबाईल टॉवरच्या बांधकामावरही कारवाई करून ते जमीनदोस्त करण्यात आले. रहाटणी व काळेवाडी परिसरात नव्याने सुरू असलेल्या एकूण पाच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून सुमारे 6671 चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण आहे.

पालिकेच्या पथकाची कारवाई
ही कारवाई कार्यकारी अभियंता मकरंद निकम व मनोज सेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग यांच्या पथकाने केली. यावेळी 1 उपअभियंता, 10 बीट निरीक्षक, पालिकेचे 10 कर्मचारी, 3 जेसीबी, ट्रक, ब्रेकर, 20 मजूर, पालिकेचे 15 पोलिस कर्मचारी तसेच वाकड पोलिस स्टेशनचे 25 पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.