भुसावळ। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पाचशे मीटर अंतरावरील मद्य दुकानांना शहरात टाळे लागल्यानंतर महिलावर्गात आनंदाचे वातावरण असतानाच शहरातील प्रोफेसर कॉलनी रोडवरील सुरभी नगरात मद्य दुकान सुरू करण्याचा घाट घातला जात असल्याने संतप्त रणरागिणींसह या भागातील सुशिक्षित नागरिकांनी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत दखल घेण्यासंदर्भात नीलोत्पल यांना साकडे घातले. संबंधित प्रशासनाने त्यानंतरही दखल न घेतल्यास रहिवासी तीव्र आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात आहेत.
गुन्हेगारी प्रवृत्तींचा होणार शिरकाव
शहरातील प्रोफेसर कॉलनी रोडवरील सुरभी नगर व परीसरात सुशिक्षीत नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर रहिवास असतानाच सुरभी टॉवर अपार्टमेंटमध्ये मद्य दुकान सुरू करण्याचा घाट काहींनी घातला असून त्या संदर्भात करारनामा करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी निवेदनाद्वारे केला आहे. मद्य दुकान सुरू झाल्यास या भागातील नागरिकांचे जगणे असह्य होईल तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींचा या भागात शिरकावही होणार आहे. निवेदन देतेसमयी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, प्रकाश चौधरी, प्रवीण पाटील, योगेश पाटील, अंबिका बोरोले, मनोज मिस्त्री, विकास झोपे, गणेश सोनवणे, योगेश बाविस्कर यांच्यासह शेकडो महिला व सुज्ञ नागरिक उपस्थित होते. दरम्यान, निवेदनाच्या प्रती, राज्य उत्पादन शुल्क विभागासह विविध विभागाच्या अधिकार्यांना पाठवण्यात आल्या आहेत.
प्रतिष्ठीत नागरिकांचा रहिवास असलेल्या भागात मद्य दुकान कुठल्याही परिस्थितीत सुरू होवू दिले जाणार नाही. या भागातील सर्व नागरिकांचा त्यास विरोध असून प्रसंगी त्यासाठी जिल्हास्तरावरदेखील तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
उमेश नेमाडे, माजी नगराध्यक्ष