रांगोळीच्या माध्यमातून साकारली पंचमहाभूते या विषयावरच्या रचना

0

 सोर्स ऑफ द आर्ट इन्स्टिट्यूट व मुक्तांगण संस्कार भारतीच्यावतीने केले आयोजन

10 हजार हुन अधिक कलाप्रेमींनी कार्यक्रमाचा आनंद

चिंचवड : सोर्स ऑफ द आर्ट इन्स्टिट्यूट या संस्थेमार्फत समाजात विविध कला व क्रीडाक्षेत्राला प्राधान्य दिले जात आहे. संस्था विविधस्तरांवर कार्यशील आहे. संस्थेच्या मुक्तांगण संस्कार भारती (पिंपरी-चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड मधिल चिंचवडगावात सर्वात मोठे रांगोळी प्रदर्शन पार पडले. रांगोळीच्या माध्यमातून पंचमहाभूते ह्या विषयावर रांगोळीच्या रचना प्रस्तुत केल्या होत्या. सलग तीन वर्षांच्या उत्तुंग यशानंतर पुन्हा चौथ्या वर्षी हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने झाला. साधारण 10 हजार हुन अधिक कलाप्रेमींनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

नगरसेवकांनी केले कौतुक

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे रांगोळी कलाकार जगदिश चव्हाण व संस्कार भारती पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश जोशी उपस्थित होते. कला ही आज खुप अत्याधुनिक स्तरावर आली आहे. कलाकारांनी याचा लाभ घेऊन देशाचे नाव उंचावर न्यावे असा संदेश चव्हाणांनी दिला. शरद कुंजीर यांनी थेट केलीग्राफी चित्रण प्रस्तुत केले. मुक्तांगण संस्थेची माहिती मधुरा कुलकर्णी यांनी दिली तर संस्कार भारतीची ओळख हर्षद कुलकर्णी यांनी करून दिली. पाहुण्यांचे स्वागत अषिश काळे व रोहीदास रोकडे यांनी रोपटे देऊन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन काळभोर यांनी केले. संस्कार भारती माजी अध्यक्ष अमित गोरखे,  प्रभागातील नगरसेवक सुरेंद्र भोईर, ब प्रभाग अध्यक्ष करूणा चिंचवडे, अपर्णा डोके, नाना काटे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

रांगोळीचा विस्तारित प्रवास

यावेळी उपस्थित कलाकारांनी पंचमहाभूते या विषयावर विविध रांगोळ्या रेखाटल्या. त्यामुळे मोठ्या आणि आशयपूर्ण अशा रांगोळ्या पाहून जगदीश चव्हाण यांनी कौतुक करताना सांगितले की, एका विशिष्ट विषयावर रांगोळी काढणे हे मोठे कष्टाचे काम असते. व्यक्तीरेखा साकारणे हे सोपे काम आहे. मात्र पंचमहाभूते या सारख्या विषयावर या कलाकारांनी मोठी मेहनत घेऊन ही कला सादर केली आहे. त्यांच्या कलेसाठी, त्यांच्या कल्पनाशक्तीसाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. रांगोळी ही आपली परंपरा आहे. मात्र आता ही परंपरा आधुनिक रूप घेऊ लागली आहे. ठिपक्यांची रांगोळी ते गालिच्याची रांगोळी असा विस्तारित प्रवास रांगोळीने केला आहे. त्यातही आता थ्रीडी इफेक्ट रांगोळीमध्ये दिसू लागला आहे