धुळे:साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून ग्रामस्थांनी अत्यंत अमानुषपणे पाच जणांची दगडांनी ठेचून हत्या केल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजता घडली होती . दरम्यान आज सोमवारी राईनपाड्यात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात असून,गावाला छावणी स्वरूप आले आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. मात्र, संपूर्ण ग्रामस्थ जंगलाकडे निघून गेल्याने गावात तणावपूर्ण शांतता आहे.
ग्रामस्थांच्या मारहाणीत सर्व मृत नाथपंथीय डवरी समाजातील असून, गावोगावी भिक्षा मागत फिरणाऱ्यांतील आहेत. सध्या त्यांचा तळ घटनास्थळाजवळील पिंपळनेर येथे होता. जिवाचा थरकाप उडविणारी ही घटना केवळ गैरसमजातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अशी घडली घटना
पिंपळनेरपासून (ता. साक्री, जि. धुळे) २५ किलोमीटरवर नवापूर (जि. नंदुरबार) सीमेवर राईनपाडा गाव आहे. तेथे आज आठवडे बाजार होता. त्या वेळी दुपारी बाराच्या सुमारास एसटी बस राईनपाड्यात दाखल झाली. बसमधून पाच व्यक्ती उतरल्या. त्या ३५ ते ५० या वयोगटातील होत्या. त्यांच्या हातात बॅग व पिशव्या होत्या. ते साध्या वेशात असल्याने आपण भिक्षेकरी आहोत, या त्यांच्या म्हणण्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. त्यापैकी दोघांनी बाजारात फिरणाऱ्या एका मुलीला जवळ बोलविले. त्यांच्यात काहीतरी संवाद झाला. मात्र, त्या मुलीने लागलीच घरी पळ काढत घरच्यांना त्याविषयी सांगितले अन् बाजारात एकच अफवाचा हल्लकल्लोळ उडाला.
ग्रामस्थांनी एकत्र येत पाच ते सहा जणांना पकडले आणि बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. यामुळे बाजार त्वरित बंद झाला. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ते पाचही जण आपण मुले पळविणारे नसून भिक्षेकरी आहोत. आमच्याकडे आधार कार्ड आहे, अशी विनवणी करत होते. मात्र, संतापलेले ग्रामस्थ काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पाचही जणांना कुणी दगडाने, कुणी लोखंडी रॉडने तर कुणी विटांनी अक्षरशः ठेचून काढले. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोघांचा उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर, साक्रीहून पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले; पण जमाव इतका प्रक्षुब्ध झाला होता, की त्यापैकी काहींनी पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांनी या घटनेची माहिती विचारली असता आणि इतके टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी पोलिसांना कळविणे महत्त्वाचे आहे, असे सांगण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता निर्माण झालेल्या वादातून संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवरही हल्ला केला.
गुन्हा दाखल
या हत्याकांडा प्रकरणी खूनाच्या भादंवि ३०२ कलमासह अन्य विविध कलमांन्वये १२ संशयितांसह जमावाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या पैकी २३ जणांना अटक केली असून अन्य संशयितांचा शोध घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे पिंपळनेर पोलिसांनी सांगितले. या घटनेतील १२ संशयितांची ओळख पटली असून त्यांची नावे अशी : बाळू मन्याराम भवरे, सुरेश मोतीराम बोरसे, अशोक गोपाल राऊत, महारू वनक्या पवार सर्व रा.राईनपाडा, मोतीराम काशिनाथ साबळे रा.निळीघोटी, ता.साक्री, दीपक रमेश गागुडे रा,सुतारे, ता.साक्री, बाबुलाल महाळचे, संदीप महाळचे, दिलीप गवळे सर्व रा.रनमळी, सुरेश कांबळे रा.काकरपाडा, काळू सोन्या गाीत, सोमा मावच्या काळ्या. यांच्यासह अन्य अनोळखी २० ते २५ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी २३ जणांना अटक केली असून उर्वरीतांना अटकेची प्रक्रिया सुरूच आहे. या सर्वांविरूद्ध पिंपळनेर पोलिसांत गुरनं ७४/२०१८ भादंवि कलम ३०२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३४१, ३४२, ३५३, ३२७,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे .
मृताच्या कुटुंबास २५ लाख द्यावे
दरम्यान जमावाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या मृतांच्या कुटुंबास प्रत्येकी २५ लाख रूपये व एकास शासकीय नोकरी द्या, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. दरम्यान मंगळवेढा परिसरातील काही गावांचे सरपंच व ग्रामस्थ पिंपळनेर येथे दाखल झाले. मृतांच्या नातेवाईकांनी येथील त्यांच्या वस्तीवरच या मागणीसाठी ठिय्या दिला आहे.
दरम्यान घटनेची माहिती कळाल्यानंतर मंगळवेढा परिसरातील खवे, मानेवाडी व अन्य गावांचे सरपंच व नाथपंथी डवरी समाजाचे ग्रामस्थ येथे येऊन दाखल झाले. समाजातील आणखी काही प्रतिष्ठित व्यक्ती पिंपळनेर येथे दुपारपर्यंत दाखल होणार आहेत. त्यानंतरच आम्ही शासनाशी चर्चा करून आपला निर्णय जाहीर करू, असे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले.