घोषणांनी दणाणले शहर : दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
भुसावळ- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा घटनेच्या निषेधार्थ पीपल्स रीपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात शनिवारी सकाळी ईन्साफ मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्यांनी जोरदार घोषणाबाजी करून शहर दणाणून सोडले. विशेष म्हणजे कधीही रस्त्यावर न येणारा गोसावी समाज प्रथमच रस्त्यावर आल्याने शनिवारचा मोर्चा ऐतिहासीक ठरला.
घोषणांनी दणाणले शहर
मुले पळवण्याच्या संशयातून राईनपाडा येथे नाथपंथी, डवरी, गोसावी व नाथजोगी समाजाच्या पाच निष्पाप जीवांची क्रुरपणे हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. आरपीडी रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगण (डी.एस.ग्राऊंड) पासून पायी मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चेकर्यांनी राईनपाडा घटनेतील दोषींना फाशी शिक्षा द्यावी, या घटनेची सीबीआय चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, मयतांच्या कुटुंबियांतील एका वारसाला शासकीय नोकरी द्यावी तसेच अत्याचार पीडीत कुटुंबाला भरपाई द्यावी, फास्ट ट्रॅक न्यायालयात हा खटला चालवावा आदी मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली.
प्रांत कार्यालयाबाहेर ठिय्या
मोर्चेकरी प्रांत कार्यालयाबाहेर आल्यानंतर त्यांनी काही वेळ रस्त्यावरच ठिय्या मांडला तर पाच जणांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी प्रशासनाला मागण्यासंदर्भात निवेदन सादर केले. पिढ्या न पिढ्या न आमचा समाज भिक्षुकी मागण्याचे काम करतो मात्र राईनपाडा घटनेमुळे समाजमन्न खिन्न झाले असून भविष्यात अशा घटना टळण्यासाठी दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मोर्चेकर्यांनी मनोगतात केली. मोर्चामुळे या भागातील वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली तर पोलीस प्रशासनाने याप्रसंगी कडेकोट बंदोबस्त राखला.
ईन्साफ मोर्चात यांचा सहभाग
पीपल्स रीपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात ईन्साफ मोर्चा काढण्यात आला. त्यात राकेश बग्गन, हरीष सुरवाडे, संगीता ब्राह्मणे, राजेश शितोळे, रमेश चव्हाण, विश्वनाथ गोसावी, रमेश बाबर, रघुनाथ गोसावी, विशाल गोसावी, नागो साळुंखे, शंकर गोसावी, विनोद गोसावी, प्रकाश चव्हाण, नारायण राठोड, कैलास गोसावी, सरू बाबर, जगन साळुंखे, धर्मा गोसावी, राकेश साळुंखे, कैलास साळुंखे, एकनाथ गोसावी यांच्यासह नाथपंथी, डवरी, गोसावी, बेलदार, जोशी तसेच पीआरआरपीच्या दहा संघटना सहभागी झाल्या.